This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
•चौफेर : अमर पुराणिक•
भारत स्वातंत्र झाला तेव्हा जवाहरलाल नेहरु यांनी ज्योतिषांच्या सल्ल्यावरुन मध्यरात्रीची वेळ निवडली होती. हे या सेक्यूलर लोकांना चालते पण स्मृती इराणी यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात ज्योतिषाचा सल्ला घेतला तर मात्र इतका मोठा वादाचा मुद्दा होतो. चमत्कारातून मिळालेले संतपद ‘गुडन्यूज’चा विषय होतो; अन्, स्मृती इराणी यांचे ज्योतिषाकडे जाणे बँडन्यूज ठरते. यालाच सेक्युलर दुट्टपीपणा म्हणतात. आज अमेरिका आणि युरोप मध्येच जवळ जवळ १०० च्या आसपास विद्यापीठात संस्कृत अध्ययन आणि त्या अनुषंगाने संशोधन पण चालू आहे. पण भारतात त्याचा उच्चारही चालत नाही.

केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी गेल्या रविवारी राजस्थानातील भिलवाडा येथील कारोई गावातील प्रख्यात ज्योतिषी पं. नाथुलाल व्यास यांची  त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. आणि तथाकथित सेक्यूलर माध्यमांचा थयथयाट सुरु झाला. भूकेल्या माध्यमांना रवंथ करायला एक विषय मिळाला. माध्यमांनी भाजपा नेत्या स्मृती इराणींवर हल्ले सुरु केले. त्यांना दांभिक ठरण्याची चढाओढ सुरु झाली. स्मृती इराणी यांना त्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्याबद्दल बोलू लागले. राजनेत्यांचे राजकीय आणि खाजगी जीवन यात हे सेक्यूलर मिडियावाले नेहमी प्रमाणे गल्लत करु लागले.
अनेकांनी त्यांना त्यांची कर्तव्यं सांगण्यास सुरुवात केली. की त्या देशाच्या मंत्री आहेत. त्यांनी शिक्षणासाठी योग्य वातावरण निर्माण करावे. वैज्ञानिक आणि तार्किक विचारांना गती देणारी शैक्षणिकनीती लागू करुन देशाच्या बालकांना अंधश्रद्धेपासून दूर करण्याचे सोडून स्मृती इराणी या बालकांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटत असल्याचाही आरोप झाला. स्वत:चे भवितव्य सुरक्षित करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तसाच तो स्मृती इराणंी यांनाही आहे. ज्योतीषशास्त्रावर आस्था ठेवणे, आपल्या कुटूंबाच्या कल्याणाकरता, मनशांती करता पूजा अर्चा करणे हे प्रत्येक हिंदूधर्मियांच्या आस्थेचे विषय आहेत. असे असताना सार्वजनिक पदावर असल्याचे सांगून त्या धर्म आणि ज्योतिषाचा आधार घेत असल्याचा आरोप केला गेला.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा या आजच्या मानवी जीवनातील अविभाज्य बाबी  आहेत. हिंदू, मुसलमान, ख्रिश्‍चन, ज्यू आदी सर्वच धर्मांवर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा पगडा आहे. पण विरोध केवळ हिंदूनाच केला जातो. मुळा आजचा बहूसंख्य सुसंस्कृत हिंदू हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक जाणतो. तो विज्ञान आणि धर्म यांची योग्य सांगड घालतो. पण तरीही या सेक्यूलरांच्या पोटात हिंदूद्वेशाची मळमळ सुरु असते. मुस्लिम, ख्रिश्‍चन धर्माविरोधात बोलताना ही सेक्यूलर मंडळी दिसत नाहीत. किंबहूना त्यांच्या विरुध्द बोलण्याची त्यांची हिंमत नाही. यात हिंदू हेच सॉफ्ट टारगेट आहेत. परदेशी कंपन्या, एनजीओंची तळी राखणारी ही मंडळी सेक्यूलर बुरखा पांघरुण हिंदूंना श्रद्धा आणि अंधश्रद्धेचे हितोपदेश देऊ पहात असतात.
मुळात ज्योतिषाशास्त्र हे शास्त्रीय आहे की नाही हा वाद गेले अनेक वर्षांपासून सुरु आहे. अनेक ज्येष्ठ वैज्ञानिक, संशोधक हे ज्योतिषशास्त्र शास्त्रीयअसल्याचे मान्य करतात. असे असतानाही तथाकथिक सेक्यूलर मंडळी मात्र ज्योतिषशास्त्राला अशास्त्रीय ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे का तर, केवळ हिंदूधर्माप्रती असलेली द्वेषाची भावना आणि उतु जाणारे सेक्यूलर प्रेम. यातूनच स्मृती इराणी ज्योतिषाकडे गेल्याचा विनाकारण कांगावा माध्यमांनी केला. आणि तो इतका केला की तो देशापूढील यक्षप्रश्‍नच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच काळात ऑस्ट्रलिया, म्यानमार, नेपाळचा दौरा केला. यात अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. या बातम्या माध्यमांना राष्ट्रहिताच्या न वाटता स्मृती इराणी ज्योतिषाकडे गेल्या ही बातमी महत्त्वाची वाटते. भविष्य पहाणे किंवा न पहाणे हा पुर्णपणे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. असे असताना माध्यमांनी याचे वीट येऊपर्यंत चर्वण केले.
यावर एक महत्त्वाचे उदाहरण देता येईल. हजारो वर्षांपुर्वी भारतीय  ॠषी-मुनींनी नव ग्रहांचा शोध लावला त्यांत त्यांनी संागितले होते की पृथ्वी गोल आहे. त्यांचे अक्षांश, रेखांश, क्षेत्रफळ आदी आपल्या महान ॠषी-मुनींनी सांगितले होते. भरती-ओहोटीचे संशोधन आणि त्याची कारणे देखील जुन्या धर्मग्रंथात विषद केली आहेत. अनेक ज्योतिषशास्त्रांच्या ग्रंथातून याचा उहापोह केला आहे. पण असे असले तरी पाश्‍चिमात्य मानवाने विशेषत: ख्रिश्‍चन, मुस्लिम यांनी पृथ्वी गोल असल्याचे सामान्यपणे मान्य केले नव्हते. अशास्त्रीय असले तरी त्यांचे धर्मग्रंथ जे सांगतात तेच शास्त्रीय असल्याचा त्यांचा दावा होता. पृथ्वी सपाट असल्याचे बॅबिलोनियन, ऱोमन, ग्रीक व हिब्रू लोक मानीत असत. बॅबिलोनियन पृथ्वी सपाट तर ग्रीक ती बशीसारखी असल्याचे मानीत. अनेक पाश्‍चिमात्य संशोधकानीही पृथ्वी गोल असल्याचे नंतरच्या काळात निदर्शनास आणून दिले. सोळाव्या शतकात प्रत्यक्ष पृथ्वी-प्रदक्षिणा केली गेली तरीही हे तेव्हाचे तथाकथित पुढारलेले लोक पृथ्वी गोल असल्याचे मान्य करायला तयार नव्हते. अनेक शतकांपुर्वीपासून पृथ्वी गोल आहे हे सांगणार्‍या हिंदू ॠषी-मुनींना अनेक शतके मुर्ख ठरवले, भारतीयांना मागास ठरवून भारतीयांची टर उडवली गेली होती. १६-१८ व्या शतकात आयझॅक न्यूटन यांनाही मुर्ख ठरणारे हे महाभाग होते. हिंदु संस्कृती, ग्रंथ, संशोधन हे झूठ असल्याचा अनेक वर्षे कांगावा केला गेला. पण सत्य लपून रहात नाही. शेवटी सत्य मान्य करावे लागले.
 मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी या ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य पहातात या मुद्याचे हे समर्थन नव्हे तर तो इराणी यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. भारत स्वातंत्र झाला तेव्हा जवाहरलाल नेहरु यांनी ज्योतिषांच्या सल्ल्यावरुन मध्यरात्रीची वेळ निवडली होती. हे या सेक्यूलर लोकांना चालते पण स्मृती इराणी यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात ज्योतिषाचा सल्ला घेतला तर मात्र इतका मोठा वादाचा मुद्दा होतो. चमत्कारातून मिळालेले संतपद ‘गुडन्यूज’चा विषय होतो; अन्, स्मृती इराणी यांचे ज्योतिषाकडे जाणे बँडन्यूज ठरते. यालाच सेक्युलर दुट्टपीपणा म्हणतात. आज अमेरिका आणि युरोप मध्येच जवळ जवळ १०० च्या आसपास विद्यापीठात संस्कृत अध्ययन आणि त्या अनुषंगाने संशोधन पण चालू आहे. पण भारतात त्याचा उच्चारही चालत नाही. स्मृती इराणी यांनी ख्रिस्ती मिशनरी ज्योतिष्याची भेट घेतली असती तर त्या सेक्युलर ठरल्या असत्या, त्यांचा उदो उदो झाला असता.
जर्मन विषयाऐवजी संस्कृत विषय शिक्षणात अनिवार्य करण्याचा स्मृती इराणी यांच्या निर्णयाचाही असाच विनाकारण गवगवा करण्यात आला. केंद्रीय विद्यालयांमध्ये तिसरी भाषा म्हणून जर्मनऐवजी संस्कृतचा समावेश करण्यावर आपण ठाम आहोत. पण, विदेशी भाषा म्हणून जर्मन यापुढेही शिकता येईल, असे स्मृती इराणी म्हणाल्या होत्या. पण विरोधक स्मृती इराणींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  प्रतिनिधी असल्याचा आणि शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा आरोप करत होते. ते लोक सरकारच्या चांगल्या कामामुळे त्रस्त झाले आहेत आणि जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संस्कृत भाषेची सक्ती करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. संस्कृतसाठी माझा आग्रह आहे, पण सक्ती नाही, असेही स्मृती इराणीनी सांगितले. यावर काही माध्यम सम्राटांनी स्मृती इराणी यांना अनाहूत सल्ले देण्याचा प्रयत्न केला. अमेठी मतदार संघातून निवडणूक हरलेली असतानाही अनुभव नसतानाही मोदी यांनी स्मृतींना मानव संसाधन मंत्रालय दिले. हे मंत्रालय अतिशय जबाबदारीचे काम आहे. त्यांचे शिक्षणही कमी आहे. असे असताना त्यांनी आपल्या कामात लक्ष घालण्याचा सल्ला दिला गेला. माध्यमांनी केवळ टीआरपी वाढण्यासाठीच स्मृती इराणींचा हा विषय ऐरणीवर घेतला. त्याला इतके महत्त्व दिले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रलिया दौर्‍यातील मिळवलेले यश, भारताचे निर्माण झालेले आंतराष्ट्रीय वजन झाकण्याचा प्रयत्न या माध्यमांनी केला आणि इराणी यांना आपल्या मंत्रालयाचे दायित्व आणि शिक्षणासारख्या महत्त्वपुर्ण क्षेत्राकडे लक्ष पुरवण्याचा फुकटचा सल्लाही देऊन टाकला. देशाच्या शिक्षणमंत्री असलेल्या इराणी यांनी विज्ञानावर विश्‍वास ठेवायचा सोडून अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर दांभिकतेचा आरोप केला आणि देशाचे भवितव्य अंधकारमय असल्याचे प्रमाणपत्रही देऊन टाकले.
अशी विकृत माध्यमे असताना देशाची काय गती होणार असा प्रश्‍न पडतो. पण देशवासीय माध्यमांचे हे सर्व विकृतचाळे जाणून आहेत. स्मृती इराणी अनानूभवी असल्यातरीही त्यांचा कामाचा उरक आणि समर्पण त्यांना मोठे यश देईल यात शंका नाही. संस्कृत ही आपली देवभाषा आहे. त्या संस्कृतसाठी स्मृती अग्रही राहिल्या आहेत. हाच त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा आणि विकासरत असल्याचा पुरवा आहे. तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलनाचे सेक्यूलर कंत्रादार कोण कोण आहेत हे जनता ओळखते. त्यामुळे स्मृती इराणींवर कॉंग्रेस व माध्यमांनी केलेला आरोप जनताच उधळून लावेल. यापूढे ही जनता असले खोटे आरोप आणि षडयंत्रांना बळी पडणार नाहीत. जनतेला आता राष्ट्रहीत आणि स्वहीत चांगले कळू लागले आहे.
•चौफेर : •अमर पुराणिक•
सत्तेत आल्यापासून मोदींनी परराष्ट्र धोरणाला विशेष महत्त्व दिले आहे. अतिशय धोरणीपणे आंतराष्ट्रीय नाती जुळवायला आणि संवर्धित करायला सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यात मोदींनी आठ देशांचे दौरे केले आहे. प्रत्येक दौर्‍यातून देशाला मोठा आर्थिक, समारिक आणि राजनैतिकफायदा करुन दिला आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशाला मोठा आत्मसन्मान मिळवून दिला आहे.

देशाची आर्थिक, सामरिक आणि वाणिज्यिक क्षमता ही परराष्ट्र धोरणावर अवलंबून असते. देशाच्या संरक्षणात आणि विकासात याचा सिंहाचा वाटा असतो.  भारत स्वतंत्र झाल्यापासून परराष्ट्र धोरणाची प्रत्यक्षात कृती नगण्य होती. भारत देश आणि भारतीय नागरिकहा कायम इतर देशांसमोर मांडलिकासारखा वागत होता. स्वत्व आणि आत्मप्रतिष्ठा हरवलेला भारत देश म्हणजे इतर देशांच्या दृष्टीने लक्ष न देण्यासारखा देश वाटत होता. इतर देशांना भारताची कळ काढणे, अपमान करणे किंवा सोयीपूरते वापरणे इतकीच उपयोगिता वाटायची. पण आता मात्र काळ बदलला आहे. नरेंद्र मोदी संचलित भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून इतर देशांना भारताविषयी भूमिका बदलणे भाग पडत आहे. याला अमेरिका, चिनचाही अपवाद नाही. मोदी आपल्या दमदार परराष्ट्र धोरणांनी देशाच्या गंगाजळीत मोठी भर घालत आहेत तर दुसरीकडे सामरिक नितीही उत्तमपणे खेळत आहे.
नरेंद्र मोदी यांनी भारताचा आत्मसन्मान जागृत केला आहे. त्या अनुषंगाने भारतवासीयांचाही हळूहळु आत्मसन्मान जागृत होतोय ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आडगळीत पडलेले भारताचे परराष्ट्रधोरण मोदी सत्तेत आल्यानंतर पुन्हा आत्मतेजाने तळपू लागलेय. सत्तेत आल्यापासून मोदींनी परराष्ट्र धोरणाला विशेष महत्त्व दिले आहे. मग ते शेजारी राष्ट्रांशी संबध असुद्यात, इतर देशांशी असलेले व्यापारिक संबंध असूद्यात किंवा बलशाली राष्ट्राशी संबंध आणि विकसनशील राष्ट्राशी नाते असूद्यात. मोदींनी अतिशय धोरणीपणे ही आंतराष्ट्रीय नाती जुळवायला आणि संवर्धित करायला सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यात मोदींनी आठ देशांचे दौरे केले आहे. आणि प्रत्येक दौर्‍यातून देशाला मोठा आर्थिक, समारिक आणि राजनैतिकफायदा करुन दिला आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे देशाला मोठा आत्मसन्मान मिळवून दिला आहे. हे करताना देशवासियांची छाती अभिमानाने फूगली आहेच. पण जगभर पसरलेल्या अनिवासी भारतीयांची पुन्हा या देशाशी नाळ जुळली गेली आहे. ते मोदींना परदेशात उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत.
मोदी यांनी १५-१६ जून रोजी पहिला परदेश दौरा केला तो भूतानचा. त्यानंतर १३ जुलै रोजी ६व्या ब्रिक्स शिखर बैठकीसाठी ब्राझील दौरा केला. ०२ ऑगस्ट रोजी नेपाळचा दौरा केला, तर ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेेंबर दरम्यान जपानचा दौरा केला. २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेचा दौरा केला. ११ ते १३ नोव्हेबर दरम्यान म्यानमारचा दौरा, १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि १९ नोव्हेंबर रोजी फिजीचा दौरा संपवून पंतप्रधान मायदेशी परतलेे. या प्रत्येक दौर्‍यात मोदींनी देशाची मान जगभर उंचावली आहे. प्रत्येक देशात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांना भेटायला, पहायला अनिवासी भारतीय अक्षरश: वेडे झाले होते. प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी भारताचा झेंडा रोवला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानवर तर मोदींनी अक्षरश: भारताची मोहिनी घातली.
भारताशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबध असलेल्या भूतानचा पहिला दौरा मोदींनी शपथ ग्रहणानंतर केला. या दौर्‍यात द्विपक्षीय संबंधांच्या सर्व क्षेत्रात चर्चा व करार झाले. विशेषत: देशाची प्राथमिक गरज असलेल्या उर्जा क्षेत्रात महत्वाचे करार केले. भूतान भारताला स्वस्त विज पुरवतो, त्यामुळे जलविद्यूत क्षेत्रात महत्वाचे विषय हताळले गेले. सध्या भूतान तीन जलविद्यूत प्रकल्पांच्या माध्यमातून १४१६ मेगावॅट विज भारताला पुरवतो आहे. आता आणखी तीन जलविद्यूत प्रकल्प सुरु केले जाणार आहेत आणि ते २०१७-१८ पर्यंत सुरु होतील. भारत-भूतान यांच्यात मुक्त व्यापार संबध आहेत. देशाचा द्विपक्षीय व्यापार आता ६८३० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. भारताने भूतानमध्ये जलविद्यूत, सिमेंट, सूचना प्रसारण आणि औद्यागिक क्षेत्रात एकूण १६ योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. पंतप्रधान मोदींनी या दौर्‍यात ६०० मेगावॅटच्या खोलोंगचू  जलविद्यूत प्रकल्पाची पायाभरणी देखील केली. तसेच पूर्व भूतानच्या त्रेशियन्ग्तसे येथिल आणखी एक प्रकल्प येत्या काही दिवसांत सुरु होईल. मोदींनी येत्या काही वर्षांत भूतानमधुन १० हजार मेगावॅट विजनिर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. दूसरे म्हणजे भारताला भूतानशी मैत्री ही सामरिक दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. कारण त्यामुळे चीनवर नियंत्रण ठेवणे भारताला सोपे जाते याचाही विचार या भूतानदौर्‍याबाबत केला गेलेला आहे.
जुलै महिन्यात ब्राझिलमध्ये ‘इठखउड’ राष्ट्रांची (इीरूळश्र, र्ठीीीळर, खपवळर, उहळरपर, र्डेीींह Aअषीळलर) परिषद झाली. या बैठकीत ब्रिक्सची नवी विकास बँक स्थापन करण्याच्या दृष्टीने करार करण्यात आला. याचा फायदा भारताला होणार आहे. ब्रिक्सच्या बैठकीत याशिवाय जलवायू परिवर्तन, जैविक उत्पादने, ओसाड क्षेत्रात वृक्षारोपण, जलसंवर्धन, भूआर्दता नियमन, कृषी-इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, जैव इंधन, औषधी वनस्पती उत्पादन, वायू गुणवत्ता प्रबंधन आदी क्षेत्रात परस्पर सहकार्याचे करार केले.
३-४ ऑगस्ट रोजी झालेल्या नेपाळ दौर्‍यात मोदींनी द्विपक्षीय सहकार्य सुदृढ़ करण्यासाठी व्यापार आणि गुंतवणूक, उर्जा-जल विद्युत, कृषि आणि कृषि उत्पादन प्रक्रिया, पर्यावरण, पर्यटन, शिक्षण, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रावर भर दिला. अपर करनाली जल विद्युत प्रकल्प विकास करारावर सह्या झाल्या. पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने नेपाळ-भारतादरम्यान मोठ्‌याप्रमाणात नवे रस्ते बांधणीचे करार झाले आहेत.
त्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानचा दौरा केला. जपान दौर्‍यात तर इतके करार झाले आहेत की तो वेगळ्या लेखमालिकेचा विषय होऊ शकतो. पंतप्रधानांना पहिला दौरा जपानचाच करायचा होता. जपानसारख्या तांत्रिकदृष्या अतिशय प्रगत देशाबरोबर भारताचे संबध मजबूत करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे मोदींसोबत अनेक व्यवसायिक, उत्पादक, त्यांचे सी.ई.ओ आणि त्यांचे शिष्टमंडळ गेले होते. या दौर्‍यात जपानने ३.५ ट्रिलियन येन म्हणजे ३५ बिलियन डॉलर्स अर्थात २,१०,००० कोटी रुपयांची सार्वजनिक आणि व्यवसायिक गुंतवणूक येत्या ५ वर्षात करण्याची घोषणा केली आहे. यात सागरी सुरक्षा, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शैक्षणिक क्षेत्रांचा समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रासाठी यात कॅनाल टॉप ग्रिड कनेक्टेड सोलर फोटोवोलॅटीक (पी वी) पावर प्लांट सुरु करण्याची घोषणा केली आहे या प्रकल्पासाठी  जपान आंतरराष्ट्रीय सहयोग संस्था (जेआयसीए) द्वारे प्रकल्प अध्ययन तात्काळ सुरु केले आहे. स्मार्ट सिटी, इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स, रस्ते विकास, विद्यूत आणि जलनियोजन, परिवहन, रस्ते, पर्यटन, अपरंपरिक उर्जा निर्मिती, स्टील, सीमेंट आणि यांत्रिक उपकरण, दूर संचार टॉवर ऊर्जा प्रबंधन प्रणाली, सिंचन, कृषी उपकरण, रेल्वे, हायस्पिड रेल्वे, सेमी हायस्पिड रेल्वे, मेट्रो, एयरक्राफ्ट, अंंतरिक्ष विज्ञान, आरोग्य चिकित्सा उपकरण, कर्करोग निदान व उपचार यंत्रणा आदी क्षेत्रात जपान गुंतवणूक करतोय. भारत आणि जपान यांच्यात वीजा प्रक्रिया सुलभ केले जाणार आहे.ज्यामुळे पर्यटन आणि व्यवसायाला वाव मिळणार आहे.
२६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत मोदींनी अमेरिकेचा दौरा केला. ‘वसुधैव कुटुंबमकम’ची हाक देत अख्खा अमेरिका मोदींनी खिशात घातला. तेथिल अनिवासी भारतीयांच्या मनात प्रचंड आशावाद आणि देशप्रेम जागृत केले. अमेरिकेसोबतही अनेक करार मदार झाले. विशेषत: शिक्षण, मानवसंसाधन, कौशल्य, संशोधन आणि औद्यागिक क्षेत्रात भागिदारीसाठी मोदींनी अमेरिकन सरकारला हाक दिली. आणि अमेरिका मागचे भारताबरोबरचे ताणतणावाचे संबंंध विसरुन भारताचा साथ देण्यास सज्ज झाली. ही किमया मोदींनी लिलया साधली.
पंतप्रधान मोदींनी ११-१३ नोव्हेंबर या काळात ब्रह्मदेश/म्यानमारचा दौरा करत आणखी एका शेजारी राष्ट्राशी संवाद साधला. यात ६ द्विपक्षिय बैठका झाल्या यात मलेशियाचे पंतप्रधान, थायलंडचे पंतप्रधान, सिंगापूरचे पंतप्रधान, ब्रुनेईचे सुल्तान, कोरियाचे राष्ट्रपती आदींसोबत महत्त्वपुर्ण बैठका झाल्या. या शिवाय १२ व्या भारत आसियान शिखर बैठकीत सहभागी झाले जेथे सर्व आशियाई देशांचे नेते उपस्थित होते. भारत-आसियान शिखर बैठकीत मोदींनी आर्थिक, औद्योगिक, व्यापार कार्यक्रमाबरोबरच अशियाई देशांना एक नवा मंत्र दिला. ‘पूरब की ओर देखो नीति’ ‘पूरब में काम करो नीति’ हा मंत्र देऊन मोदींनी अशियाई देशांच्या संबंधांना नव्या युगात नेले आहे. याबरोबर चीनची समुद्री दादागिरी थांबवण्याच्यादृष्टीने पावले उचलली. दक्षिण चीनी सागरात शांती आणि स्थिरतेसाठी प्रत्येकाने नियम आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले.
१४-१८ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारत-ऑस्ट्रलियांत आर्थिक भागिदारींचे महत्त्वपुर्ण करार झाले. येथेही कृषि, संसाधन, ऊर्जा, अर्थ,  शिक्षण, विज्ञान आणि औद्यागिक विकासाच्या वाटा खुल्या करणारे करार झाले. शिवाय लैंगिक समानतेच्या आणि महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने प्रयत्न करण्यावर चर्चा झाली. ऑस्ट्रलियातही अनिवासी भारतीय आणि ऑस्ट्रलियन नागरिकांना मोदींची भूरळ पडली होती. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी ऍबॉट यांनी मोदींच्या राजकारणापासून बोध घेण्याचा सल्ला दिला आहे. भारत-ऑस्ट्रलिया संबंध विकसनाबरोबरच येथे पुर्व अशियाई शिखर बैठक, जी-२० शिखर बैठक झाली. आणि १९ नोव्हेंबरला मोदींनी फिजीचा दौरा करुन ते मायदेशी परतले आहेत.
गेल्या सहा महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्रधोरण काय असते आणि विकासाचे राजकारण काय असते हे दाखवून दिले आहे. राष्ट्रसन्मानाची जाणिव देशवासियांना करुन दिली आहे. आज भारताची मान जगात परराष्ट्रधोरणांमुळे उंचावत आहे. विकासक, प्रशासक, शासक, सेनापती आणि सेवक अशा सर्वच नात्यांतून मोदींनी भारतवासियांना दिलेल्या ‘अच्छे दिन आनेवाले है’ या वचनाची पुर्तता करण्यास सुरवात केल्याचे दिसून येत आहे. ‘अच्छे दिन आनेवाले है’ ही केवळ निवडणूक जिंकण्याची घोषणा नव्हती तर भारत देश अच्छे दिन उपभोगणार असल्याची ही कृती आहे.
•चौफेर : •अमर पुराणिक•

मोदी मंत्रीमंडळावर डॉक्टर्स, इंजिनीअर्स, बँकर्स अशा स्कॉलर लोकांचा पगडा आहे. सामाजिक क्षेत्राबरोबर राजकारणही ‘शिकलेल्यांचे क्षेत्र’ होत असेल त्याचे भरभरून स्वागतच करायला हवे. हुशार व्यक्तींच्या कौशल्यांचा व त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा राष्ट्रीय राजकारणात सहभाग करून घेत ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला हा प्रयत्न सफल होणार यांत शंका नाही.

मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राची धूरा हाती घेतली. त्यावेळी मंत्रीमंडळ स्थापन करताना त्यांनी कोणताही पसारा न वाढवता आपले मंत्रीमंडळ संक्षिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. ’लेस गव्हर्मेट’चा यशस्वी वापर करत मोदींनी देशाची प्राथमिक घडी बसवण्यात बर्‍यापैकी यश मिळवले आहे. पण वेगवान प्रगतीची कास धरणार्‍या मोदींनी गेल्या रविवारी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला आहे. गेल्या पाच महिन्यात मोदींनी ज्या वेगाने विकास कामांचा सपाटा लावला आहे ते पाहता मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. मंत्रीमंडळातील हा पहिला फेरबदल अंतिम नसून भविष्यात आणखीन परिवर्तनाची शक्यता आहेच. मंत्रीमंडळाचा विस्तार करताना येथून पुढची वाटचाल आणखी दमदार असेल याचे संकेत मोदींनी दिले आहेत. गोव्याची माजी मुख्यमंत्री मनोेहर पर्रिकर आणि सुरेश प्रभु यांची केंद्रिय मंत्रीमंडळातील निवड याचे द्योतक आहे.
प्रगती आणि विकास या दोन संकल्पनांनी सध्या भारतीय जनमानसावर चांगलीच पकड घेतली आहे. त्यातच जागतिक अर्थव्यवस्था आणि जगातील अन्य प्रगत देशांतील उद्योग, राहणीमान व जीवनशैली यांच्याशी परिचित होण्याच्या संधी गेल्या काही वर्षांत इंटरनेट आणि सोशल मिडियामुळे वाढल्या आहेत. त्यामुळे आर्थिक वाढ, जीडीपी, विकास हे शब्द थोडेबहुत सामान्य भारतीयांच्या तोंडी रुळू लागले आहेत. उदारीकरणाचा प्रभाव असलेल्या व त्याचा हिस्सा असलेल्या भारतीयांच्या किमान दोन पिढ्यांनी आर्थिक वाढीचा दर आणि विकास या मुद्द्यावरच केंद्रातील सत्ता पालटली आहे. या जागरूक अशा कोट्यवधी भारतीयांनी देशाच्या वेगवान विकासाच्या दृष्टीने भाजपाच्या हाती एक हाती सत्ता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाच महिन्यात विकास कामांची चूणूक दाखवली आहे.
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार तसेच काही फेरबदल करताना विकासाचा दमदार वेग साधण्याचा प्रयत्न करत तीन राज्यांत होणार्‍या निवडणुकांवर देखील लक्ष ठेवले आहे. मे महिन्यात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यानंतर विस्तार कधी होणार याची अनेकांना उत्सुकता होती. क्षमतेपेक्षा अधिक खाती सांभाळावी लागत असल्याने काही मंत्र्यांची दमछाक होत होती. आता ही अडचण काही प्रमाणात दूर झाली असे म्हणता येईल. मंत्र्यांची संख्या कमी ठेवूनही उत्तम सरकार देता येते असे मोदी यांचे तत्व असून त्यात गैर काही नाही. त्यामुळेच त्यांनी संख्या कमी ठेवण्यावर भर दिला. मात्र एवढ्‌या मोठ्‌या देशाच्या तेवढयाच मोठ्‌या समस्या लक्षात घेता तत्वाला मुरड घालणे अपरिहार्य ठरते. त्यामुळे नव्या विस्तारात ४ कॅबिनेट आणि १७ राज्यमंत्र्यांचा समावेश केला आहे. मंत्र्यांची संख्या आता ६६ वर गेली असली तरी यापूर्वीच्या मनमोहनसिंग सरकारच्या तुलनेत ती कमीच आहे. त्या मंत्रीमंडळात ७८ मंत्री होते. मोदींच्या मंत्रीमंडळात काही नवख्या-अनानुभवी लोकांना संधी दिल्याची काहींची तक्रार आहे. पण मोदींनी जुन्या जाणत्या अनुभवी लोकांच्या अनूभवाचा, कार्यशैलीचा देशाला फायदा करुन देत असतानाच तरुण व नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना मंत्रीमंडळात संधी देऊन पुढची पीढी तयार करण्याचा सुवर्णमध्य साधला आहे.
मंत्रीमंडळ विस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारपूर्वक पावले टाकत चार हुशार नेते केंद्रीय मंत्री मंडळात सहभागी करून घेतले आहेत. ते म्हणजे मनोहर पर्रिकर, सुरेश प्रभू, जयंत सिन्हा आणि राजीवप्रताप रुडी.
मनोहर पर्रीकर आणि सुरेश प्रभू यांची राजकारणातील प्रतिमा अतिशय स्वच्छ, प्रामाणिक असून दोघेही कामसू व अभ्यासू म्हणून ओळखले जातात. आयआयटीयन असलेले मनोहर पर्रीकर हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्रीपदावर आरुढ झाले आहेत. मनोहर पर्रीकर हे अतिशय परिश्रमी, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्याचा नावलौकिक वाढविला आहे. अतिशय साधी राहणी आणि सातत्याने जबाबदारीची जाणीव असलेला नेता,करारी व्यक्तिमत्त्व आणि शिस्तबद्ध संघस्वयंसेवक अशी त्यांची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी योग्य निवड केली आहे. निर्णय घेताना ते कायम देशहिताचाच विचार करतील याची सर्वांनाच खात्री आहे. चीन आणि पाकिस्तान सीमांवर सध्या जो ताणतणाव दिसून येतो त्यामुळे उत्पन्न होणार्‍या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाला राजनीतीज्ञ आणि जाणकार तंत्रज्ञ अशी दुहेरी क्षमता असलेल्या नेत्याची आवश्यकता होती. राजकारण आणि अभियंते अशा दोन्ही भूमिका लीलया पेलणारे पर्रीकर यांच्या रुपाने ती भरून निघेल. त्यांच्या शैलीला नवे आयाम लाभू शकतील. हे महत्वपूर्ण खाते सांभाळणे म्हणजे कोणा येरागबाळ्याचे काम नव्हे. मनोहर पर्रीकर यांची आज ज्या संरक्षणमंत्री पदावर नियुक्ती झाली त्या पदास न्याय मिळाला असे म्हणण्यास वाव आहे.
चार्टड अकाऊंटन्ट असलेले सुरेश प्रभू राजापूर मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात उद्योग, उर्जा, अवजड उद्योग, पर्यावरण अशा महत्त्वपूर्ण खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. त्यावेळी प्रभू यांच्या कामाचे सर्वच राजकीय पक्षांनी कौतुक केले होते. सुरेश प्रभूंचा पहिल्या कॅबिनेट मंत्रीमंडळात सहभाग होईल असे वाटत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सुरेश प्रभूंसाठी आग्रह धरला होता. मात्र शिवसेनेने प्रभू यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. मात्र मोदींनी शिवसेनेचा विरोध झुगारुन प्रभू यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. शपथविधीपूर्वी सुरेश प्रभू यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला त्यामुळे मंत्रीपदाचा मार्ग सुकर झाला. वाजपेयी यांच्या काळातील मंत्रीपदाचा तसेच विविध अभ्यास मंडळांवरील अनुभव आणि कार्यक्षमता लक्षात घेता सुरेश प्रभू रेल्वे खात्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील अशी आशा करायला हरकत नाही. पण ते नद्याजोड, उर्जा, तंत्रज्ञान क्षेत्रात जास्त माहीर आहेत. तसे मंत्रीपद त्यांना मिळाले असते तर ते जास्त योग्य झाले असते.
जयंत सिन्हा यांची नियुक्ती काहीशी अनपेक्षित परंतु सुखद म्हणायला हवी. माजी केद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा याचे सुपुत्र असलेले जयंत सिन्हा हे उच्चविद्याविभूषित आहेत. पर्रीकर यांच्याप्रमाणे आयआयटीयन तर आहेतच परंतु हार्वर्ड बिझीनेस स्कूलमधून व्यवस्थापन शिकलेले आहेत.
केद्रीय मंत्रीमंडळात हंसराज अहीर यांचा समावेश ही महाराष्ट्राच्या दृष्टीने आणखी एक महत्वाची बाब. गेली अनेक वर्षे चंद्रपूर जिल्ह्यातून निवडून येणारे अहीर स्वभावाने सौम्य भासत असले तरी त्याच्या कामाचा उरक मात्र प्र्रचंड आहे. हंसराज अहिरांनी संपुआ सरकारचा कोळसा गैरव्यवहार उघडकीस आणाल होता.
मंत्रीमंडळात नव्याने वर्णी लागलेल्या काही राज्यमंत्र्यांची नियुक्ती  येत्याकाळात होणार्‍या निवडणूका लक्षात ठेवून केलेली दिसते. नवी दिल्ली, बिहार आणि बंगाल या तीन राज्यांत नजीकच्या काळात निवडणुका व्हायच्या आहेत. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी डॉ. हर्षवर्धन यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्याची भाजपाची खेळी यशस्वी ठरली होती. त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी हर्षवर्धन यांच्याकडील आरोग्य खाते बदलून त्यांना विज्ञान खाते देण्यात आलेले असावे. याचा अर्थ निवडणुकीकडे ते जास्त लक्ष पुरवू शकतील. बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजीवप्रताप रूडी, गिरीराजसिंह यांच्याबरोबरच लालूप्रसाद यादव यांचे कट्टर विरोधक रामकृपाल यादव यांची मंत्रीमंडळात वर्णी लावण्यात आली आहे. यातून मोदीं यांनी विकासाबरोबरच राजनीतीही साध्य केल्याचे दिसते.
एकूणच मोदी मंत्रीमंडळावर डॉक्टर्स, इंजिनीअर्स, बँकर्स अशा स्कॉलर लोकांचा पगडा आहे. सामाजिक क्षेत्राबरोबर राजकारणही ‘शिकलेल्यांचे क्षेत्र’ होत असेल त्याचे भरभरून स्वागतच करायला हवे. हुशार व्यक्तींच्या कौशल्यांचा व त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा राष्ट्रीय राजकारणात सहभाग करून घेत ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला हा प्रयत्न सफल होणार यांत शंका नाही.