सूर संगत स्वरप्रभूंची

अमर पुराणिक
पं. प्रभूदेव सरदार
अनहत आद नाद को पार न पायो |
पचिहारी गुणी ग्यानी ॥
 बलीहारी उन गुरुन की अहीमदजीको |
नाद भेद की बात बखानी ॥
हिंदुस्थानी शास्त्रिय संगीतातील ‘गौरीशंकर’ जयपूर घराण्याचे उध्वर्यु उस्ताद अल्लादिया खॉं यांनी बांधलेल्या ‘शंकरा’ रागातील वरील बंदिश स्वरप्रभू कै. पं. प्रभूदेव सरदार यांच्या अतुलनीय गायकीबद्दल बरेच काही सांगून जाते. ओंकार नादब्रम्हाची प्रचिती देणारी गायकी पं. प्रभूदेव सरदार(गुरुजी) यांच्या अनेक मैफलीतून कानसेनांनी ऐकली, अनुभवली. अनेक वर्षांच्या कठोर साधनेतून त्यांनी मिळालेली स्वरसिद्धी, अफाट रागविद्या, संगीत ज्ञानभांडार त्यांनी स्वरप्रेमी सूज्ञ व अज्ञ रसिकांना ‘गावो बजाओ रिझावो’  तत्वाने ऐकवली, तसेच त्यांच्या शिष्यांना खूल्या दिलाने शिकवली. पण आम्हा शिष्यांची झोली दूबळी ठरली. आता आपण त्या समृद्ध स्वर अमृताला आपण सर्वजण मुकलो आहोत. गुरुवार दि. १३ मार्च २००८ रोजी त्यांचे गोव्यात एका शिष्याला मल्हार शिकवता शिकवता दु:ख निधन झाले. त्यांचा स्वरात्मा अनंतात विलीन झाला.
शुद्धता, शुचिर्भूतता आणि सात्विक वृत्ती ही पं. प्रभूदेव सरदार यांची स्वभाव वैशिष्ट्ये. त्यांच्या दैनंदिन जीवनात जसा या वैशिष्ट्यांचा प्रभाव दिसे, तसाच संगीतशास्त्र, स्वरविद्या, रागविद्या, बंदिशीमध्येही दिसत असे. स्वरांच्या शुद्धतेवर त्यांचा विशेष कटाक्ष असे, बेसूरेपणा, बेशिस्त त्यांना अजिबात खपत नसे. आपल्या बजुर्गांनी केलेल्या राग, बंदिशी यांच्या शुद्धतेला त्यांनी विशेष महत्त्व दिले, त्यांचे पावित्र्य जपले. त्याच बरोबर नवनिर्मिती करतानाही मूलतत्वाचा पाया भक्कम ठेवण्याचा गुरुजींचा ध्यास असे. नव्या, जुन्या सर्व शिष्यांना स्वरज्ञानाचे महत्त्व ते वारंवार सांगत. स्वरांचे खास स्थान असते, त्यांना प्रकृती असते, त्यातून तो भाव जिवंत होणे महत्त्वाचे असते. गुरुजी कायम सांगत की, रागांत जिवंतपणा आला पाहिजे. गुरुजींच गाणं हे उत्कट भावनांनी चिंब भिजलेलं असे.
पं. प्रभूदेव सरदार हे बेळगांवच्या राणी कित्तूर चन्नमा यांचे सरदार गुरुसिद्धय्या सरदार यांचे  थेट वंशज. सरदारांचे मूळ अडनाव चरंतीमठ. पण राणी कित्तूर चन्नमांचे सरदार असल्यानेे त्यांना ही पदवी मिळाली होती. पं. प्रभूदेव सरदारांचे वडील मडीवाळेश्‍वर सरदार हे सोलापूरचा आले व सोलापूरातच ते स्थाईक झाले. सोलापूरकर होऊन गेले. मडीवाळेश्‍वर सरदार हेे बॅरिस्टर होते. सोलापूरचे ख्यातकिर्त वकिल होते. पं. प्रभूदेव सरदार ही विधीज्ञ होते. विधीसेवे बरोबरच संगीताची मोठी सेवा त्यांनी केली.
पं. प्रभूदेव सरदार यांना आग्रा घराण्याचे पं. जगन्नाथबुवा पुरोहित व जयपूर घराण्याचे पं. निवृत्तीबुवा सरनाईक यासारख्या दिग्गजांकडून तालिम मिळाली. या दोन्ही गुरुंचे पं. प्रभूदेव सरदार हे गंडाबंध शिष्य होते. त्यांच्याकडून त्यांना असंख्य राग शिकायला मिळाले. जगन्नाथबुवांनी प्रचलित रागांबरोबरच राग स्वानंदी, जौन भैरव आदींसारखे अनेक अप्रचलित राग शिकवले. शिवाय ललत रागातील ‘जा जा रे जा रे बलमवा’, नट भैरव रागातील ‘गुंज रही किरत तुम्हरी’, जौन भैरव मधील ‘लाडली री मोरी’ आदी बंदीशी गुरुजींना विशेष प्रिय होत्या. जगन्नाथबुवांनंतर निवृत्तीबुवांकडून  भरभरून रागविद्या मिळाली. त्यात प्रचलित रागांप्रमाणेच अप्रचलित, अनवट रागांचा जास्त अंतर्भाव होता.  निवृत्तीबुवांनी अनेक सुंदर सुंदर चिजा, प्राचिन व पारंपरिक व जयपूर घराण्याच्या बंदिशी गुरुजींना शिकवल्या.
गुरुवर्य पं. प्रभूदेव सरदार म्हणजे रागांचा आणि बंदिशींचा चालता बोलता कोशच होते. सरदार प्रचलित सर्व रागांबरोबरच अनवट राग व विशेष करुन जयपूर घराण्याचे राग त्यामध्ये राग सांजगीरी, डागुरी,  मालीगौरा, पंचम, कौंसी, परज, संपुर्ण मालकंस,  सावनी, मालवी, नंद, जैताश्री, पटमंजीरी, हिंडोल, देवगंधार, ललितागौरी, खट, बहाद्दूरी तोडी, बसंती केदार, जैत कल्याण, परमेश्‍वरी, कालिंगडा, भंखार तसेच शुक्ल बिलावल, यमनी बिलावल, ककुभ बिलावल, सुखिया बिलावल, देवगीरी बिलावल, आदी बिलावलचे प्रकार, रामदासी मल्हार, गौड मल्हार, चरजु की मल्हार, धुलिया मल्हार आदी मल्हारचे प्रकार, कान्हडा प्रकारामध्ये  हुसेनी कान्हडा,  बसंती कान्हडा,  त्याचबरोबर स्वानंदी, भैरव बहार, भैरव भटियार, ललत बहार, गारा बागेश्री, नट कामोद, नटबिहाग, नट, लंकादहन सारंग अशा अनेक रागांचा व बंदिशींचा  प्रचंड खजीना पं. प्रभूदेव सरदारांकडे होता.
गुरुजी म्हणजे मैफिलीचे बादशाहच होते. त्यांची मैफल हमखास रंगत असे. मैफिलीत जान आणणे त्यांना सहज साध्य झालेले होते. त्यांची तब्येत लागली नाही असे कधी झाले नाही. मैफिलीत राग शंकरा, बिहाग, दरबारी, मेघ, श्री, मुलतानी, बसंत, तिलककामेद,  सरस्वती, पुरियाधनश्री, गौड सारंग,  गौड मल्हार, बहार, गुजरी तोडी, बिलासखानी तोडी, भैरव, देसी, जौनपुरी, कौंसी, जैताश्री, सावनी, सुहा, खट तोडी असे राग गाऊन मैफल जिंकण्याची हतोटी त्यांना प्राप्त झाली होती.
गुरुजींचा पल्लेदार आवाज तीन सप्तकात लिलया फिरत होता. ते स्वर लावताना स्वच्छ व नैसर्गिकरित्या लावत, मोकळेपणाने लावत. ते कधी आवाजाच्या गोडी करता गळा आवळून लावत नसत किंवा  जवारीकरिता आवाज रेकत नसत. त्यांचा स्वर कधी वर वर लागत नसे. आवाज सरळ नाभीतून निघे. मंद्र सप्तकात गंधार, रिषभ, मंद्र षड्‌ज स्पष्ट व सहज लागत. तार सप्तकात पंचम धैवत पर्यंत स्वर सहज जात असे. ओढून ताणून वरचे स्वर लावण्याचा ते कधी प्रयत्न करत नव्हते. त्यांचे बोल उच्चारण स्पष्ट असत. त्यांचे झुलते-डुलते बोल रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत असत. त्यांच्या आलापीत, बोलात, बोल तानात आणि तानपलट्‌यातही गमकेचा बाज कायमच असे. त्यामुळे स्वरात कधी तुटकपणा एकेरीपणा येत नव्हता. संथ लयीत चिजेला सुरुवात करुन चिजेचा मुखडा सुंदररित्या बांधून समेवर सहजपणे येत. गुरुजी उपजअंग फार अप्रतिम ठेवत. त्यांच्या सरगमी बोलतानाही सुंदरच असत. लयबद्धता हे तर त्यांच्या गायकीचे प्रमुख सूत्रच होते. आक्रमक लयकारी, तालाच्या लग्गीबरोबर स्वरांच्या गमकेची क्रीडा आणि प्रवाही लयीचे मूळ सूत्रं ही जयपूर गायकीची आणि विशेषत: पं. प्रभूदेव सरदारांच्या गायकीची बलस्थाने होती. बंदिशीचा अर्थ, त्यातील भाव, रागांची प्रकृती यांचा लालित्यपुर्ण मिलाप हेच त्यांच्या मैफली रंगण्याचे मर्म होते. गाताना गुरुजी कधीही वेडावाकडा चेहरा, अंगविक्षेप, मुद्राभंग आदी भाव करुन गात नव्हते. त्यांची मुद्रा प्रसन्न व शांत असे. गाताना रसिकांशी ते थेट संवाद साधत.
गुरुजींना उस्ताद आमीर खॉं, पं. मल्लिकार्जुन मन्सूर व पं. कुमार गंधर्व यांच्या बद्दल प्रचंड श्रद्धा व आदर होता. पण त्यांची ही श्रद्धा डोळस होती. उस्ताद अमीर खॉं साहेबांची गायकी त्यांना खूप आवडायची. त्यांच्या गायकीचा प्रभाव त्यांच्या गाण्यावर होता. खॉंसाहेबांची संथ आणि अती विलंबीत लयीतील आलापी अतिशय प्रभावी होती. राग दरबारी कान्हडा, मालकंस, तोडी, पुरीया, मारवा, बैरागी भैरव, कोमल रिषभ आसावरी, मल्हार, मेघ, यमन हे खॉंसाहेबांचे आवडते राग. त्यांच्या मंद्र व वजनदार आवाजात हे राग खूप खूलत. त्यांच्या विलंबीत लयीतील हे पुर्वांग प्रधान राग ध्यानयोगाची प्रचिती देतात. मेरूखंड प्रकारातील सरगम, गमक युक्त ताना ही सर्व वैशिष्ट्ये पं. प्रभूदेव सरदार यांच्या गायकीत होती. गुरुजी म्हणायचे की, खॉंसाहेबांच्या यमन रागातील ‘शहाजे करम बमने गुरुवे’ ही बंदीश ऐकतानाच ध्यान लागते. तर अमीर खॉंसाहेबांना गाताना किती आनंद मिळत असेल! अमीर खॉं सोलापूरला आले की, त्यांचा मुक्काम सरदार वाड्‌यावर असे. खॉंसाहेबांनी बांधलेल्या  दरबारी कान्हडा रागातील ‘किन बैरन कान भरे’, मालकंस मधील ‘जीन के मन राम बिराजे’, ‘आज मोरे घर’, कोमल रिषभ आसावरी रागातील ‘जगत सपना’, ललत रागातील ‘कहा जागे रात’, बैरागी भैरव रागातील ‘मन सुमिरत निस दिन’ अशा अनेक बंदिशी कोणीही अट न घालता उस्ताद अमीर खॉं यांनी गुरुजींना दिल्या. गुरुजीही बहुदा या रागात याच बंदिशी गात असत.
जयपूर घराण्याचे पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांची गायकीही गुरुवर्य पं. प्रभूदेव सरदार यांनी विशेष प्रिय होती. मूळात जयपूर घराण्याची गायकीच गुरुजींना प्रिय होती. मल्लिकार्जुन मन्सूर यांची अफाट दमसास, आकारात्मक आलापी, दमदार गमकयुक्त धृपद अंगाच्या पल्लेदार ताना, आक्रमक व बलपेचांची लयकारी ही जयपूर घराण्याची वैशिष्ट्ये मल्लिकार्जून मन्सूर यांच्या गायकीत ठासून भरलेली असायची. मन्सूरांप्रमाणेच गुरुजींच्या गाण्यातही ही वैशिष्ट्ये पूरेपूर भरलेली होती. अल्लदिया खॉंसाहेबाचे अवघड राग, अनवट राग, जोड रागांचा खजीना पं. मल्लिकार्जुन मन्सूरांप्रमाणेच सरदारांकडेही होता. गुरुजी म्हणत, ‘अण्णांच्या (मल्लिकार्जुन मन्सूर) गाण्यात सळसळते चैतन्य भरलेले असे. गाताना रागात अण्णा अक्षरश: बुडून जात होते. दमदार धृपद अंगांच्या ताना, बोलताना, खास जयपूर अंगाची लयकारी ऐकताना मंत्रमुग्ध होतो, वेडावून जातो.’
‘पं. कुमार गंधर्व यांच्या इतका अभ्यास, चिंतन, मनन शास्त्रिय संगीत जगतात गेल्या ४०, ५० वर्षात कोणीही केले नसेल’, असे गुरुजी म्हणत. कुमारांची वैशिष्ट्यपुर्ण उत्तरांगप्रधान गायकी, तानाची अनोखी पद्धत, आलापाची स्वत:ची पद्धत, त्यांनी बांधलेले राग व बंदिशी हा कुमारांच्या श्रेष्ठतेचा पुरावा आहे. मला स्वत:ला गुरुजींनी सुुरुवातीला कानावर शुद्ध व योग्य संस्कार व्हावेत म्हणून उस्ताद अमीर खॉ, पं. मल्लिकार्जुन मन्सूर , पं. कुमार गंधर्व, डागर बंधू, उस्ताद सईदुद्दीन डागर, उस्ताद राशिद खॉं व पं. अजय चक्रवर्ती यांचेच गाणे ऐकायला सांगत. गुरुजींना हे तीन गवई प्रभावित करण्याचे मुख्य कारण म्हणजे ख्याल गायनातील शुद्धता. उस्ताद अमीर खॉं, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. कुमार गंधर्व, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. निवृत्तीबुवा सरनाईक आणि पं. प्रभूदेव सरदार यांनी काटेकोरपणे जपली. रसिकांना प्रभावित करण्यासाठी त्यांनी कधी हलक्या हरकती, वरवरच्या ताना किंवा ठुमरी, दादर्‍यातल्या ताना, मुरक्या मारल्या नाहीत. विचीत्र प्रयोग कधी केले नाहीत. रागाची शुद्धता, ख्यालाची शुद्धता कधी ढळू दिली नाही, आणि महत्त्वाचे म्हणजे शास्त्रशुद्ध गाऊनही त्यांच्या गाण्यात कधी रुक्षपणा आला नाही. सरदारांच्या गाण्यात ‘दर्द’ पुरेपूर भरलेला होता.
पं. प्रभूदेव सरदार
खयाल गायकी बरोबरच शुद्ध शास्त्रिय संगीत प्रकारातील धृपद-धमार गायकी त्यांना आकर्षित करायची. उस्ताद हुसेनोद्दिन डागर, सईदउद्दीन डागर, जहिरउद्दीन डागर, वसिफउद्दीन डागर आदी डागर बंधू, गुंडेचा बंधू यांच्या मैफिली आणि ध्वनीमुद्रीका आवर्जून ते ऐकत. शिवाय निर्मळमनाने इतर गायकांच्या कार्यक्रमांचाही ते आनंद घेत. श्रेष्ठ गजल गायक मेहदी हसन यांच्या गजला त्यांना प्रिय होत्या. त्यात भूपेश्‍वरी रागातील ‘अब के हम बिछडे है’ यमनकल्याणमधील ‘रंजीशी सही’, जिंदगी मे तो सभी’, भंखार रागातील ‘खूली जो आँख’, मल्हार रागातील ‘एक बस तु ही’,  किरवानी रागातील ‘शोला था जल बुझा हूं’, नटभैरव मधील ‘गो जरा सी बात पर’ या गजला तसेच ‘उमड घुमड घीर आयी रे’ ही ठूमरी, ‘तीर नैनो का’ हा दादरा, मांड रागातील ‘केसरीया बालम’ हे राजस्थानी मंाड ते आवडीने ऐकत. गजल गायिका बेगम अख्तर, मेहदी हसन, बरोबरच परविन सुल्तान, उस्ताद बडे गुलाम अली खॉं यांच्या ही गायन शैलीची ते तारिफ करत.
जुन्या गायकांबरोबरच नव्या गायकांनाही तेही ते तिक्याच मनमोकळेपणाने प्रोत्साहन देत. त्यात उस्ताद रशिद खॉं, पं. अजय चक्रवर्ती, पं. मुकुल शिवपुत्र(मुकुल कोमकळ्ळीमठ, पं. कुमार गंधवार्र्ंचे चिरंजीव), पं. राजन साजन मिश्र, जगदीश प्रसाद, अश्‍विनी भिडे-देशपांडे, आरती अंकलीकर, श्रुती सडोलीकर, व्यंकटेशकुमार यांचा समावेश आहे. 
पं. प्रभूदेव सरदारांनी त्यांची समृद्ध गायकी व रागविद्या युवापीढीत रुजवली आहे. शिष्यांकडून त्यांना मोठ्‌या अपेक्षा होत्या. त्यात प्रामुख्याने सुजन साळकर (मुंबई), शाम गुंडावार(चंद्रपूर), त्यांच्या ज्येष्ठ कन्या पार्वती माळेकोपमठ यांचा समावेश आहे. पार्वतीताईंनी खूप कमी वेळात मोठी भरारी मारली आहे. कर्नाटकमध्ये त्या खूप लोकप्रिय आहेत. गुरुजींची गायकी त्या तोलामोलाने गातात. याशिवाय रमेश कणबसकर, यांची कामगिरीही उल्लेखनीय आहे. त्यांच्या गाण्यातील भाव व स्वरांची आर्तता ऐकून गुरुजींच्या डोळ्यात आश्रु वाहत असत. त्याप्रमाणे दीपक कलढोणे हे पं. प्रभूदेव सरदार व पं. जितेंद्र अभिषेकी या दोन दिग्गजाकडून शिकलेले आहेत. गुरुजींची गायकी मोठ्‌या ताकतीने व स्वतंत्र विचारांनी ते गातात.
 सतत ६०, ७० वर्षे आपल्या अतुलनीय गायकीने रसिकांना लुब्ध करणार्‍या माझ्या गुरुजींना कधी प्रसिद्धीची हाव नव्हती. ते अतिशय स्थितप्रज्ञवृत्तीचे होते. कोणत्याही लौकीक मोहाला बळी न पडता. त्यांनी स्वत:ला व गायकीला सोज्वळ ठेवले. आपल्या स्वरोपासनेचा यज्ञ अखंड चालू ठेवला. आपल्या राहणीतील प्रतिष्ठितपणा, भाषेतील मितस्तपणा, समतोल गुणग्राहकता आणि स्वरशारदा मां सरस्वतीवरील निष्ठा व श्रद्धा दिव्य होती.  हा त्यांचा आदर्श रसिकांना, कलावंतांना स्फुर्तीदायक आहे. सोलापूरचे नाव जगभर पोहाविलेल्या स्वरप्रभू कै.पं. प्रभूदेव सरदारांना ही स्वरांजली त्यांच्याच आवडत्या श्री रागातील बंदिशीने -
प्रभू के चरण कमल पर निस दिन सुमीर रे |
भाव धर सुध भीतर भवजल धितर रे ॥
जो ही जो ही धरत ध्यान पावत समाधान |
हररंग कहे ग्यान अब हूं चित धर रे ॥
................
२३ मार्च २००८, दै. तरुण भारत, सोलापूर, आसमंत

0 comments:

Post a Comment