नितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष

नितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष
·अमर पुराणिक·
 भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या भाजपाध्यक्ष पदाच्या कारकीर्दीला नुकतीच दोनवर्षे पूर्ण झाली. त्यांनी आपल्या गेल्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत देशभर दौरे करून भाजपाला नवसंजीवनी दिली, नवचैतन्य निर्माण केले. राष्ट्रीय स्तरावर आज गडकरींनी भाजपाला एका नव्या उंचीवर नेले आहे. येत्या काळातही ही चढती कमान चढतीच राहणार आहे! त्यांच्या अद्भुत कार्यशैलीचे फलित आपण पाहतच आहोत. त्यांच्या कल्पक नेतृत्वातून अनेक अभिनव उपक्रम भाजपाच्या वतीने राबविण्यात आले, राबविले जात आहेत. त्यांचे फलित येत्या निवडणुकांमध्ये प्राप्त होणार आहे. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सच्चे आणि हाडाचे स्वयंसेवक असलेले नितीन गडकरी यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळून त्यांच्यात ऊर्जा निर्माण केली. आज देशातील राजकारणात, महाराष्ट्राबरोबरच विशेषत: भाजपाशासित राज्यांत गडकरींनी अनेक दमदार सामाजिक, राजकीय, विकासाचे उपक्रम राबविले आहेत. राष्ट्रीय राजकारण, योजना, अर्थकारण, पक्षकार्य, विकासकाम, उद्योगक्षेत्र, तंत्रज्ञान आदींबाबत गडकरी यांचे चिंतन, योजना आणि धडाडी ही अनुकरणीय अशीच आहे. हाडाचा कार्यकर्ता काय असतो, हे नितीन गडकरी यांनी आपल्या आचरणातून सिद्ध करून दाखविले आहे.
सकारात्मक बेरजेचे राजकारण हा भाजपा नेते कै. प्रमोद महाजन यांचा हातखंडा होता. नितीन गडकरी यांनीही अशीच भूमिका घेत आपले कौशल्य वापरून भाजपा-शिवसेना-रिपाइं ही महायुती साकार केली आहे. नितीन गडकरी, शिवसेना नेते उद्धव ठाकरे, भाजपा नेते खा. गोपीनाथ मुंडे, रिपाइं नेते रामदास आठवले यांनी या महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचा सत्तेचा सोपान दृष्टिपथात आणला आहे. येत्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार आहे.
गुजरातमध्ये नरेंंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाची जोरदार घोडदौड सुरूच आहे. कर्नाटकमध्येही माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली चांगली घोडदौड सुरू होती, पण कॉंग्रेस आणि जनतादलाने अनेक खोटे आरोप करून भाजपाच्या विकास कार्यक्रमात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. या स्थितीत गडकरींनी अतिशय परिपक्व भूमिका घेऊन कॉंग्रेसच्या राजकारणाला शह दिला आहे. बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आदी राज्यांतही विकासगती अतिशय प्रभावी राहिली आहे. नितीन गडकरी अध्यक्ष झाल्यापासून अनुसूचित जाती, जमाती, असंघटित क्षेत्रांत कामगार संघटना उभी करून भारतीय जनता श्रमिक महासंघाचा भव्य कार्यक्रम केला. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात १५ ते २० हजार कामगार उपस्थित होते. याशिवाय बुद्धिवाद्यांची संख्या वेगळीच. तसेच मध्य प्रदेशमध्ये आदिवासी विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले. आदिवासी इलाख्यात सर्वत्र पोहोचण्याचा सतत प्रयत्न सुरूच आहे. ‘इंडिया व्हीजन २०२५’ या उपक्रमाचे नियोजन आणि रूपरेषा आता अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपाकडे आता २७ कक्ष आणि प्रकोष्ट आहेत. उत्तम व पारदर्शी प्रशासनासाठी भाजपाशासित राज्यांतील कार्यालयांच्या पद्धती बदलल्या आहेत. नवे कार्यकर्ते, नागरिक यांना भाजपापर्यंत पोहोचविण्यात चांगले यश मिळत आहे.  या प्रयत्नात तरुणांमध्ये पोहोचण्यात नितीन गडकरी यांनी आघाडी घेतली आहे.
आता होऊ घालणार्‍या उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा या चारही राज्यांमधील निवडणुकांत नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाचा करिश्मा दिसणारच आहे. भाजपाने  अंत्योदय, ग्राम, गरीब, कामगार, शेतकरी, तरुणवर्ग, उद्योग आणि आर्थिक मुद्दे यांना प्रधान्य दिले आहे. यामध्ये दारिद्ऱ्यनिर्मूलन, रोजगार निर्मिंती, शेती, ग्रामीण अर्थशास्त्र बदलवणे याला विशेष महत्त्व असून, गडकरी यांच्या विकासाच्या राजकारणाला हळूहळू चांगले यश मिळत आहे.  बिहारचा ११ टक्के जीडीपी पोहोचला. मध्य प्रदेश हे पूर्वी कॉंग्रेसच्या काळात अतिशय कमकुवत राज्य होते. ते ८.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. अजून पुष्कळ गोष्टी सुधारण्याची इच्छाशक्ती गडकरी यांच्याजवळ आहे. गुड गव्हर्नन्सचा महामंत्र जपत भाजपाने ऊर्जा, दळणवळण, खाजगी, सार्वजनिक गुंतवणुकीला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. आज भाजपा कर्नाटकमध्ये शेतकर्‍यांना वीज मोफत देते आणि १ टक्कादराने कर्ज देते, तर मध्य प्रदेश ३ टक्के दराने कर्ज देते.
उत्तर प्रदेशासाठीही भाजपाजवळ अनेक चांगल्या योजना आहेत. उत्तर प्रदेशात नुसती पिकाची एक जात बदलली तर तेथील उत्पन्न ६ हजार कोटी रुपयांनी वाढेल, असा गडकरींना विश्‍वास आहे. ज्यादिवशी येथे भाजपाचे राज्य येईल तेव्हा  सिंचन आणि पाटबंधारे यांना केंद्र व राज्याच्या संयुक्त सूचीमध्ये आणले जाईल. तसे झाले तरच लोक पुन्हा एकदा गावाकडे जातील, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे.
विकास कामांसाठी काम करण्याची मानसिकता हवी, प्रबळ इच्छाशक्ती हवी. ही इच्छाशक्ती असल्यास अडचणीतही विकासकामे चांगल्याप्रकारे करता येतात. याचा प्रत्यय नितीन गडकरी यांनी या आधीच भाजपाप्रणित रालोआ सरकारच्या काळात आणि महाराष्ट्रातील भाजपा-शिवसेना युतीच्या काळात दाखवून दिले आहे. बीओटीचा अतिशय प्रभावी आणि अनोख्या पद्धतीने उपयोग गडकरी यांनी केला. किंबहुना नितीन गडकरीच बीओटी तंत्राचे जन्मदाते आहेत. या तंत्राच्या माध्यमातून १६ हजार गावांत पक्के रस्ते करून दाखविले. मुंबईच्या उड्डाणपुलांसाठी भांडवली बाजारपेठेतून पैसा उभा केला. मुंंबई-पुणे द्रुतगती मार्ग, ठाणे-भिवंडी मार्ग तयार केला.
बर्‍याचदा नितीन गडकरी यांचा उल्लेख उद्योजक म्हणून केला जातो. गडकरी म्हणतात की, मी उद्योजक म्हणजे कारखानदार वगैरे नाही, तर बरीच एनजीओ चालवतो. त्यांचे पाच ऊर्जाप्रकल्प आहेत. तेथे आज ४ रुपये दराने वीज दिली जाते. पर्यावरण हवे, पण विकासदेखील हवा. असे असताना याचा समन्वय साधत गडकरींनी सौरऊर्जा प्रकल्पांकडे विशेष लक्ष देऊन सौरऊर्जा निर्मितीत मोठी आघाडी घेतली आहे. त्याचप्रमाणे बायोमासपासून वीज तयार केली जाते. असे अनेक उपक्रम नितीन गडकरी यांच्या कल्पक नेतृत्वातून फुलले आहेत, फुलू पाहत आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून गडकरींनी १० हजार लोकांना रोजगार दिला असून, पुढील वर्षी ४० हजार जणांना रोजगार देण्याचा त्यांचा मानस आहे.
आज देशात ५८ हजार कोटी रुपयांचे अन्न सडतेय. अशावेळी गरीब, बेरोजगारांची किमान उपासमार तरी होऊ नये म्हणून अन्न सुरक्षेअंतर्गत सुरक्षा दिली पाहिजे आणि सरकारने सबसिडी दराने जीवन जगण्यापुरते का होईना अन्न दिले पाहिजे, अशी गडकरी यांची भूमिका आहे. गरिबांना स्वस्त दरात अन्न दिले पाहिजे. भाजपाशासित छत्तीसगढ सरकार १ रुपया दराने तांदूळ देत आहे. त्याप्रमाणेच पंजाब, हरियाणातही गहू सडवण्याऐवजी तो गरिबांना मोफत द्या, अशी गडकरी यांची मागणी आहे. त्याचप्रमाणे इथेनॉल, जैविक इंधन, जलविद्युत प्रकल्प हे गडकरी यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
अटलजींच्या एनडीएच्या काळात केलेला कारभार, ग्रामसडक योजना, ऊर्जाप्रकल्प, किसान क्रेडिट कार्ड योजना केल्या. त्या काळात निर्यातीत मोठी वाढ झाली, विकासदर वाढला. भाजपाने जागतिक बँकेकडे गहाण पडलेले सोने पुन्हा देशात आणले. यात भाजपाची तत्त्वे, भूमिका आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या अनेक नेत्यांचे कठोर परिश्रम व देशाप्रती प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचे फलित असून, या विकासाच्या बळावर कॉंग्रेसने नंतरची कारकीर्द चालवली, पण स्वत: कोणत्याही नव्या योजना, उपक्रम राबवले नाहीत. त्याची फळे आज देश भोगतोय! फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच शिल्लक राहिला आहे! भ्रष्टाचार, महागाई, काळा पैसा यांबाबत कॉंग्रेस निरुत्तर झाली आहे. टू-जी, कॉमनवेल्थ घोटाळा, आदर्श, लवासा अशा अनेक महाघोटाळ्यांमुळे कॉंग्रेसची विश्वासार्हता संपली आहे. अशा स्थितीत नितीन गडकरी यांचे नेतृत्व आणि भाजपा यांच्यावर जनतेची मोठी भिस्त आहे.
नितीन गडकरी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून कार्यकर्त्यांना ‘लढा, आक्रमक व्हा’, हा मंत्र दिला. ‘राजकारण म्हणजे सत्ताकारण’ ही व्याख्या बदलली पाहिजे. ‘‘राष्ट्रवाद ही आमची प्रेरणा आहे. विकास आणि सुशासन ही मोहीम आणि अंत्योदय हे आमचे उद्दिष्ट असून, राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर मी असा क्रम असला पाहिजे’’, अशी भूमिका घेत गडकरी यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत मोठी मजल मारली आहे. यापुढेही प्रामाणिक प्रशासन, पारदर्शकता, विकासकामे कशी होतील? या प्रयत्नातून प्रभावी कामगिरी करीत गडकरी हे भाजपाला सत्तासोपानापर्यंत पोहोचवतील यात शंकाच नाही!

0 comments:

Post a Comment