महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन
अमर पुराणिक
६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेबांचे निधन झाले. दिल्लीहून त्यांचे पाथिर्र्व विमानातून रात्री ३.१५ वा. मुंबईत आणण्यात आले. रात्री सांताक्रूझ विमानतळावर सुमारे २५ हजारांचा जमाव जमला होता. त्यानंतर ऍम्ब्युलन्समध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून ऍम्ब्युलन्समध्ये खास प्रकाशयोजना करण्यात आली होती. सांताक्रूझ ते दादर हे ५ मैलांचे अंतर पार करण्यासाठी ३ तास लागले होते. ५ वा. ५ मिनिटांनी ऍम्ब्युलन्स राजगृहापाशी आली. तेथे रात्रभर साडेतीन लाख लोक वाट पाहत उभे होते. धीरगंभीर वातावरणात ‘बुद्धं शरणं गच्छामी’चा घोष होत होता. प्रचंड गर्दीवर काबू मिळवणे पोलिसांना आणि समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना अशक्य झाले होते. ५.१५ वा. बाबासाहेबांचे पार्थिव ऍम्ब्युलन्समधून उतरवण्यात आले, तेव्हा जनसमुदायाच्या अश्रूंचा बांध फुटला. अर्ध्या तासानंतर लोकांना दर्शनाची मुभा देण्यात आली.
७ डिसेंबर रोजी दुपारी २ वा. राजगृहापासून अंत्ययात्रा निघाली. सुमारे १२ लाख लोक त्यात सामील झाले होते. सायं. ७ वा. दादर चौपाटीवर बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या हस्ते बौद्ध धम्म दीक्षाविधी झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाल्यानंतर वर्षभराने चैत्यभूमीची उभारणी झाली. बौद्ध संस्कृतीनुसार या स्थळावर चैत्यस्तूप उभारण्यात आला. म्हणून त्या परिसराला चैत्यभूमी म्हणतात. दरवर्षी लाखो आंबेडकरप्रेमी व अनुयायी या महामानवाला आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर जमतात.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, ऐतिहासिक बदलांचे अग्रणी. भारतीय समाजात समरसता निर्माण करून दलित, पीडितांचे पुनरुज्जीवन त्यांनी केले. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!’ हा मंत्र या समाजाने स्वीकारला. त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन, पण आपल्या अपत्यांना शिकवीन, त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर करीन! हा ध्यासच सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुले डॉक्टर, इंजिनीअर झाली आहेत असे नाही, पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार केला. आज या समाजाच्या साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के इतके विक्रमी आहे. आज ५० वर्षांनंतर ऍड. शंकरराव खरात, डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि डॉ. नरेंद्र जाधव हे महाराष्ट्रातल्या नामवंत अशा पुणे, मुंबई, संभाजीनगर या विद्यापीठांचे कुलगुरू झाले आहेत. युनिव्हर्सिटी गँ्रड कमिशनचे आजचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात सार्‍या देशातल्या उच्चशिक्षणाची धुरा सांभाळीत आहेत; तर डॉ. भालचंद्र मुणगेकर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य आहेत. डॉ. नरेंद्र जाधव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ असून, ते रिर्झव्ह बँकेचे सल्लागार होते. शेकडो लोक पीएच.डी. झाले तर हजारो लोक डॉक्टर आहेत, इंंजिनीअर आहेत, आर्किटेक्ट आहेत. हजारो लोक प्राध्यापक आहेत आणि प्राथमिक-माध्यमिक शिक्षकांची तर फौजच आहे. समाजातील सर्वोच्च समजल्या जाणार्‍या आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांमध्ये डझनाने अधिकारी या आंबेडकरी समाजातले आहेत. अभिमान वाटावा असा मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग या समाजामध्ये निर्माण झाला आहे. हे सर्वकाही डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांनी आपल्या अपूर्व कष्टातून रुजविलेल्या तत्त्वरूपी बीजांचे फलित आहे. आयएएस, आयपीएस, यूपीएससी, एमपीएससी या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आंबेडकरी समाजाने मोठा दबदबा निर्माण करीत उत्तुंग यश मिळवीत आहेत. साहित्याच्या क्षेत्रातही दलित साहित्याने आपला ठसा उमटवीत स्वतंत्र असा इतिहास निर्माण केला आहे. दलित कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, निबंध, प्रवासवर्णन आणि वैचारिक लेखनादी क्षेत्रांतील कार्याने भल्याभल्या सरस्वतीपुत्रांनाही तोंडात बोटे घालायला लावले आहे. केवळ ग्रंथच लिहिले नाहीत, तर आपला वाचकवर्गही त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपाशीर्वादाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक ग्रंथ अभिमानाने व तेजाने आज तळपताना दिसत आहेत. दलित साहित्य आणि दलित जाणीव, दलित चळवळ आणि अलीकडे आंबेडकरी चळवळ ही देशातल्या अन्य कोणत्याही प्रांतात निर्माण होऊ शकली नाही इतकी मोठी ती महाराष्ट्रात निर्माण झाली; याचे कारण स्वत्व, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि अस्मिता यांची पेरणी या आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. या समाजाला अनेक क्षेत्रांत ‘गरुडभरारी’ घेण्यासाठी पंखांना बळ दिले या महामानवाने.
नागपुरातील दीक्षाभूमी असूद्यात किंवा मुंबईतील चैत्यभूमी असूद्या, तेथे लागणारी पुस्तकांची दुकाने, गावोगाव भरणारी साहित्यसंमेलने आणि त्या प्रत्येक साहित्य संमेलनाच्या बाहेर थाटलेली पुस्तकांची दुकाने, सीडी, कॅसेट्स यांची लागणारी दुकाने हा खरोखर आश्चर्याचा विषय आहे. तीर्थक्षेत्रावर हार, तुरे, माळा, नारळ, कुंकू, बुक्के, शेले, दुपट्टे, चादरींची रेलचेल असते, अगदी तशीच दीक्षाभूमीवर नानाप्रकारच्या हजारो प्रकारच्या ‘ग्रंथसंपदेची मांदियाळी’ झालेली दिसते. हिंदू तीर्थक्षेत्रांवरून हिंदू बांधव पवित्र गंगाजल आणतात, मुस्लिम बांधव हज यात्रेवरून ‘आब-ए-जमजम’ आणतात, आमचे बौद्ध बांधव मात्र दीक्षाभूमीवरून बुद्ध, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आणि प्रतिमा घेऊन येतात. ज्या समाजाला अक्षरबंदी होती, तो समाज ज्ञानाकांक्षी बनविला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्म चळवळीने. ही ज्ञानाकांक्षा हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या समृद्ध समाजाचे सामर्थ्य आहे. अशा या महामानवाला महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!

0 comments:

Post a Comment