...आणि बुद्ध हसला!

...आणि बुद्ध हसला!
सन्मानजनक भारताच्या बुद्धिसामर्थ्याची प्रचिती  : पोखरणच्या ‘ऑपरेशन शक्ती’ची
(अमर पुराणिक)
राष्ट्रतेज अटल बिहारी वाजपेयी
मिसाईल मॅन’ डॉ. अब्दुल कलाम
 ‘...आणि बुद्ध हसला’! माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी प्रचंड आत्मविश्‍वास आणि आत्मसन्मानाने नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. दिवस होता दि. ११ मे १९९८. कारण होते पोखरण येथे झालेल्या ‘ऑपरेशन शक्ती’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या यशस्वी अणू चाचण्यांचे. याची माहिती संपूर्ण देशाला व जगाला देण्यासाठी अटलजींनी ही पत्रकार परिषद बोलावली होती. संपूर्ण देश अटलजींकडे अतिशय अभिमानाने पहात होता. त्यावेळचे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार व अणू संशोधन कार्यक्रमातील मुख्य संशोधक, महामहिम माजी राष्ट्रपती ‘मिसाईल मॅन’ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम व त्यांच्या वैज्ञानिक सहकार्‍यांकडे सार्‍या देशासह आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या या ‘राष्ट्रतेजा’कडे आवाक् होऊन पहात होता, चकित व अचंबित झाला होता. भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांच्या बुद्धिसामर्थ्यशाली व प्रभावी कर्तृत्वाची  प्रचिती देत होता.
डॉ. आर. चिदंबरम्
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पंतप्रधान अटलजींच्या नेतृत्वाखाली राजस्थानातील पोखरण येथे ५ अणुचाचण्या यशस्वी केल्या. त्यात दि. ११ मे १९९८ रोजी ३ व १३ मे रोजी २ अशा चाचण्या घेतल्या. या ‘ऑपरेशन शक्ती’ ला आज बुद्ध पौर्णिमा दि. ९ मे २००९ रोजी १० वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्या कॉंग्रेस, संपुआ सरकारला अणुचाचण्यांची दशकपूर्ती हा राष्ट्रसन्मानजनक दिवस साजरा करावासा वाटला नाही, पण भाजपा व इतर विरोधी पक्ष मात्र या अणुचाचणीची दशकपूर्ती साजरी करीत आहेत. या अणुचाचण्यांमुळे भारत वैज्ञानिक व आथिर्कक्षेत्रात अतिशय सक्षम झाला. हिंदूंची आराध्यदेवता भगवती शक्तिदेवीच्या नावाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन शक्ती’, पोखरण- २ या अणू उपक्रमामुळे देशाची शक्ती शतपटीने वाढली आहे. पाकिस्तानसारख्या उपद्रवजन्य शेजारी राष्ट्राच्या कुरापतींमुळे सतत भारत असुरक्षित राहिला आहे. त्या सारख्याच गुरकावणार्‍या पाकिस्तानला अटलजींनी आपल्या मुत्सद्देगिरीने पाचर ठोकली. पाकिस्तानने, आपण केले म्हणून क्षमता नसतानाही अणुचाचण्या घेतल्या. त्याचे परिणाम आज पाकिस्तानी जनता भोगतेय !
अटलजींसह तेव्हाचे प्रमुख नेते उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्र, अरुण शौरी, अर्थमंत्री यशवंत सिन्हा, संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस आदी रथींसह वैज्ञानिक महारथी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, ऑटोमिक एनर्जी विभागाचे प्रमुख डॉ. आर. चिदंबरम्, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी), डिफेन्स रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट  ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) या भारतीय सेनेच्या ५८ रेजिमेंट आर्मी इंजिनीअरिंग ग्रुपचे सैनिक व अधिकारी यांच्या प्रभावी समन्वयाने व अतिशय गुप्तता राखत पोखरणच्या अणुुचाचण्या यशस्वी केल्या, याचा जगाला पत्ताही लागला नाही. ‘तंत्रज्ञानातील बाप’ म्हणवणार्‍या अमेरिकेलाही आपल्या वैज्ञानिकांनी भरदिवसा तारे दाखवले. त्यांच्या अत्याधुनिक उपग्रह यंत्रणेला याचा सुगावाही लागला नाही. पोखरणमधील सैनिक व संशोधक चाचण्यांच्या तयारीचे काम शक्यतो रात्रीच्या वेळीच करीत. हे सर्व करत असताना गोपनीयता महत्त्वाची होती. अमेरिकेची उपग्रहयंत्रणा अद्ययावत असल्याने त्यांच्या उपग्रहावर या चाचण्यांचा कोणताही मागमूस येता कामा नये याची खबरदारी घेत आपल्या सर्व संशोधकांनी जवानांची वेशभूषा व सैन्यातील पदे धारण करीत ५८ इंजिनीअरिंग रेजिमेंटबरोबर उत्तम संवाद जमवला होता. ऐन चाचणीच्या दिवशी सकाळपासूनच होणारे हवेतील बदल व हवेची दिशा बदलल्याने सतत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत चाचण्या यशस्वी केल्या.
मुळात अणुचाचण्यांची संकल्पना थोर संशोधक डॉ. राजा रामण्णा यांची. सन १९६४ साली याला सुरुवात झाली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील १९६२ सालच्या चीन युद्धातील अपमानजन्य व निराशजनक पराभवानंतर अणुशक्ती निर्मितीची खरी सुरुवात झाली. १८ मे १९७४ साली पहिली चाचणी घेण्यात आली, पण ती फारच सामान्य अवस्थेतील होती आणि त्यानंतरच्या काळात भारतीय शास्त्रज्ञांनी अणू संशोधनात आजतागायत देदीप्यमान प्रगती केली आणि त्याचा प्रत्यय १३ मे १९९८ या बुद्ध पौर्णिमेला आला. आंतरराष्ट्रीय समुदाय व अमेरिकेने एलटीबीटी, एनएनपीटी, सीटीबीटी अशा करारांचा बडगा सतत भारतावर उगारला, पण देशात प्रथमच भाजपाप्रणित सरकारचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दमदार नेतृत्वाची चुणूक दाखवीत या अणुचाचण्या यशस्वी करून दाखविल्या. इच्छाशक्तिहीन कॉंग्रेसला ५० वर्षांच्या सत्ताकालात हे करता आले नाही. गेल्यावर्षीच्या अणुकरारात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या संपुआ सरकारने ‘हाईड ऍक्ट’समोर आपली नांगी टाकली व संपूर्ण देशाला अंधारात ठेवत अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण कराराच्या जाचक अटींचा खुलासा करणारे पत्र लापवीत आपली लाचार भूमिका दाखवली. याला कारण फक्त सकारात्मक काम व इच्छाशक्तीचा आभाव. अटलजींच्या सरकारातील योजनांची सत्तापालटानंतर फक्त अंमलबजावणी जरी केली असती तरी कॉंग्रसला मोठी प्रगती साधता आली असती, पण ‘विरोधासाठी विरोध’ हेच कॉंग्रेसचे घातकी धोरण देशाला महागात पडले.
‘ऑपरेशन शक्ती’अंतर्गत एकूण ५ अणुचाचण्या घेण्यात आल्या, ज्या ‘शक्ती १, शक्ती २, शक्ती ३, शक्ती ४ आणि शक्ती ५’ या सांकेतिक नावाने ओळखल्या जातात. या अणुचाचण्यांच्या माध्यमातून भारताने संरक्षणात्मक तंत्रज्ञानाबरोबरच वैज्ञानिक, उपग्रह, ऊर्जा असे अनेक अद्ययावत व प्रगतीशील तंत्रज्ञान साध्य केले आहे. यात वर उल्लेखिलेल्या संशोधकांबरोबरच पडद्यामागील व अप्रकाशित अशा संशोधकांचा उल्लेखही कृतज्ञतेने करणे आपले कर्तव्य आहे. यात बीएआरसीच्या थर्मो न्युक्लियर वेपन डेव्हलपमेंटचे डॉ, सतींद्रकुमार सिक्का, न्युक्लियर फ्युएल ऍन्ड ऑटोमेशन मॅन्युफॅक्चरिंग ग्रुप; नुक्लियर कांपोनंट मॅन्युफॅक्चरचे संचालक डॉ. रामकुमार, रेडिओ केमिस्ट्री ऍन्ड आयसोटॉप ग्रुप; न्युक्लियर मटेरिअल ऍक्विझिशनचे संचालक डॉ. डी.डी. सूद, सॉलिड स्टेट फिजिक्स ऍन्ड स्पेक्ट्रोस्कोपी ग्रुप; डिवाईस डिझाईन ऍन्ड असिस्टंटचे संचालक डॉ. एस.के. गुप्ता, इलेक्ट्रॉनिक्स ऍन्ड इन्स्ट्रुमेंटेशन ग्रुप; फील्ड इन्स्ट्रुमेंटेशनचे संचालक डॉ.जी. गोविंदराज तसेच डीआरडीओचे वरिष्ठ अधिकारी इंजिनीअर्स डॉ. के. संतनाम, डॉ. एम. वासुदेव आदींबरोबरच डीआरडीओ, बीएआरसी, मुंबई, पिलानीसह सर्व शाखांचे सर्व इंजिनीअर्स, भारतीय सेना, जैसलमेर सेनातळ यांच्याही महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण प्रत्येक भारतीयाला भूषणास्पद आहे.
भारतात असलेल्या दर्जेदार तंत्रज्ञ व संशोधकांना भाजपाच्या अटलजींच्या सरकारप्रमाणेच सहकार्य देत अथक परिश्रम करीत नव्या युगाच्या नव्या तंत्रज्ञानाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवल्यास भारत महासत्ता होणारच होणार ! माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम म्हणतात त्याप्रमाणे सन २०२० पर्यंत भारत देश महासत्ता होणार ! ते याच जोरावर, पण येणारे प्रत्येक शासन याला किती महत्त्व देते, यावर सर्वकाही अवलंबून आहे.

0 comments:

Post a Comment