This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
•चौफेर : अमर पुराणिक•
आसाममध्ये भाजपानं स्पष्ट बहूमत मिळवत अभूतपुर्व असा विजय मिळवला. भाजपाच्या दृष्टीने खरे तर ‘पॅन इंडिया’ची प्रतिमा निर्माण करण्याची संधी होती. काही अंशी का होईना पण तशी प्रतिमा निर्माण करण्यात भाजपाने यश मिळवले आहे. या निवडणुकीत महत्त्वाच्या अशा आसाम आणि केरळ या दोन राज्यातील सत्ता गमावत कॉंग्रेस रसातळाला गेली आहे. कॉंग्रेसमुक्त भारतच्या दिशेने कॉंग्रेस स्वत:हूनच आणखी दोन पावले पुढे गेली आहे. ६० वर्षाहून अधिक काळ सत्ता उपभोगूनही राष्ट्राचा विकास साधू न शकणार्‍या दिशाहीन कॉंग्रेसची ही स्थिती होणे साहजिक आहे. त्यामुळे भाजपाचे प्रसरण होणे आणि कॉंग्रेसचे आकुंचन होण हे राष्ट्रहिताच्या दृष्टीने चांगलेच आहे असे म्हणावे लागेल.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. आसाममध्ये भाजपानं स्पष्ट बहूमत मिळवत अभूतपुर्व असा विजय मिळवला. तर पश्‍चिम बंगाल आणि केरळमध्ये चांगली कामगीरी केली. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसने तर तामिळनाडूत जयललिता यांनी आपला गड राखला. या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वात महत्त्वपुर्ण आणि लक्षणीय विजय ठरला तो आसाममधील भाजपाचा विजय. भाजपाच्या दृष्टीने खरे तर ‘पॅन इंडिया’ची प्रतिमा निर्माण करण्याची संधी होती. काही अंशी का होईना पण तशी प्रतिमा निर्माण करण्यात भाजपाने यश मिळवले आहे. ७० च्या दशकानंतर राष्ट्रव्यापी पक्ष म्हणून र्कॉग्रेसने आपली प्रतिमा गमवायला सुरुवात केली होती. तर ८० च्या दशकानंतर भाजपाने आपली राष्ट्रव्यापी पक्ष म्हणून प्रतिमा निर्माण करण्यास सुरुवात केली होती. या निवडणुकीत महत्त्वाच्या अशा आसाम आणि केरळ या दोन राज्यातील सत्ता गमावत कॉंग्रेस रसातळाला गेली आहे. कॉंग्रेसमुक्त भारतच्या दिशेने कॉंग्रेस स्वत:हूनच आणखी दोन पावले पुढे गेली आहे. ६० वर्षाहून अधिक काळ सत्ता उपभोगूनही राष्ट्राचा विकास साधू न शकणार्‍या दिशाहीन कॉंग्रेसची ही स्थिती होणे साहजिक आहे. त्यामुळे भाजपाचे प्रसरण होणे आणि कॉंग्रेसचे आकुंचन होण हे राष्ट्रहिताच्या दृष्टीने चांगलेच आहे असे म्हणावे लागेल.
खरे तर कॉंग्रेसच्या या दारूण पराभवाला कॉंग्रेस श्रेष्ठी, कॉँग्रेस नेते आणि कॉंग्रेसची भूमिका कारणीभूत आहे. जेएनयु मधल्या राष्ट्रद्रोही घोषणाबाजीचे  समर्थन करणे कॉंग्रेसला महागात पडले आहे. स्वत: कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जेएनयुमध्ये जाऊन कन्हैय्या कुमार, उमर खालिद आदी राष्टद्रोही कृत्यं करणार्‍यांचे समर्थन केले. दुसरी बाब म्हणजे पाकिस्तानमध्ये जाऊन भारताविषयी बदनामीकारक विधानं सलमान खुर्शिद आणि मणीशंकर अय्यर सारख्या नेत्यांनी केली. देशातील जनतेला दूधखूळी समजून काहीही वाह्यात आणि स्वैर विधानं आणि कृती करुन कॉंग्रेसने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. तिसरा मुद्दा म्हणजे संसदेचे कामकाज सतत गोंधळ घालून बंद पाडले. ही बाब देखील कॉंग्रेसच्या पराभवाला जबाबदार आहे. कॉंग्रेस रसातळाला जात असताना नव्याने पक्षबांधणी करणे, तळागाळापासून पक्षसंघटन मजबूत करणे सोडून कॉंग्रेस उंटावरुन शेळ्या राखण्याचे काम करत आहे. दिल्लीत बसून काही उठवळ माध्यमांना हाताशी धरुन भाजपा सरकारवर, पंतप्रधान मोदी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात, असंबद्ध विधान करण्यातच कॉंग्रेसने धन्यता मानली त्याचीच बक्षिसी जनतेने कॉंग्रेसला पराभवाच्या रुपात दिली आहे. राष्ट्रीय प्रश्‍नांवर, सामाजिक प्रश्‍नावर आणि विकासकामांबाबतीतही कॉंग्रेसने नकारात्मक भूमिका अखंडपणे राबवली आणि आत्मघात करुन घेतला. कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड वगळता इतर सर्व राज्यातून कॉंग्रेस हद्दपार झाली आहे. येत्या काळात कर्नाटक, हिमाचल आणि उत्तराखंडातूनही कॉंग्रेस हद्दपार होणार आहे. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात भाजपा बलवान आहे त्यामुळे ही राज्यं येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा काबीज करणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवत असताना कॉंग्रेसचे आता ममता, जयललिता, नवीन पटनायक यांच्या पक्षांइतकेही स्थान रहिलेले नाही आणि याला कॉंग्रेसची करणीच जबाबदार आहे.
या पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल अतिशय बोलके आणि दिशादर्शक आहेत. ३४ वर्षांचा डाव्यांचा गड पश्‍चिम बंगालमध्ये पुर्णपणे कोसळला आहे. डाव्यांनीही काही पोथीपंडीतांना हाताशी धरुन, कन्हैयाकुमारला चुचकारुन स्वत:च कम्युनिस्ट हद्दपार करण्यास हातभार लावला आहे. जमिनीशी नाळ तुटलेल्या कम्यूनिस्ट पक्षाची अशी अवस्था उंटावरुन शेळ्या राखण्याच्या वृत्तीमुळेच झाली आहे. कोठेतरी एक उक्ती वाचली होती की, ‘बंगाल तो तरबूज है जो बाहरसे हरा और भीतरसे लाल है’ पण आता ही उक्ती डाव्याबाबत खोटी ठरली आहे. ‘कॉंग्रेस मुक्त भारत’ प्रमाणेच आता ‘वाम मुक्त भारत’ हे वाक्य खरे ठरले आहे. चीन्यांची हुजरेगीरी करणारे डावे भारतातून हद्दपार होणे राष्ट्रहीताच्या दृष्टीने आवश्यक आहे. पश्‍चिम बंगालपुरते का होईना पण हे खरे ठरले. चीन, रशियातून बंगालमार्गे भारतात आलेली कम्यूनिस्ट संस्कृती क्षीण होत होत बंगालच्या उपसागरात बूडाली हे बरे झाले. बंगालमध्ये डावे पराभूत झालेले असले तरी केरळमध्ये अजून डाव्यांचे मुळ शिल्लक आहे. भाजपाने केरळमध्ये आपले खाते उघडले आहे. भाजपाला केरळमध्ये एक जागा मिळाली आहे. भाजपाचे उमेदवार केरळमधील ज्येष्ठ नेते ओ राजगोपाळ यांनी ही मुहुर्तमेढ रोवली आहे. राजगोपाळ यांच्या विजयाबाबत पंतप्रधान मोदी यांनीही आनंद व्यक्त केला आहे. भाजपाला केवळ एक जागा मिळालेली असली तरी भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. भाजपाला जवळजवळ १४-१५ टक्के मते मिळाली आहेत. केरळप्रमाणेच पश्‍चिम बंगालमध्येही भाजपाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. तामिळनाडूचा आपला गड जयललिता यांनी कायम राखण्यात यश मिळवले आहे. तामिळनाडूत मात्र भाजपाची स्थिती सुधारलेली नाही.
आसाममध्ये मात्र भाजपाने इतिहास रचला आहे. अभूतपुर्व असा विजय आसाममध्ये भाजपाने नोंदवला आहे. भाजपाचा हा विजय म्हणजे ईशान्य आणि पुर्व भारतात भाजपाचे बस्तान बसण्याची ही दमदार सुरुवात आहे. आसाममध्ये ३० टक्क्याहून अधिक मुस्लिम मतदार आहेत असे असतानाही भाजपाचा विजय झाला. गेल्या तीन दशकांपासून आसाम सतत कोणत्या ना कोणत्या आंदोलनाच्या विळख्यात सापडला गेला आहे. त्यामुळे आता सत्तेत आल्यामुळे भाजपाच्या दृष्टीने ही संधीही आहे आणि आव्हानही. आसाममध्ये भाजपाने सर्वानंद सोनोवाल सारखा उमदा आणि कर्मठ व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवला आहे त्याची फळे नक्कीच चांगली मिळणार आहेत. भाजपाच्या या विजयात पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमाणेच पक्षाचे महासचिव राम माधव यांनाही सिंहाचा वाट द्यावा लागेल. त्यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि धोरणीपणे निवडणुक जिंकण्याच्या दृष्टीने रणनीती आखली आहे. अनेक वर्षे ईशान्य भारतात संघाचे काम राम माधव यांनी केल्याने भाजपाला त्याची गोमटी फळे चाखायला मिळत आहेत. आसाम आणि केरळमध्ये गेल्या अनेक दशकांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय आहे. तेथील जनतेसाठी संघाच्या स्वयंसेवकांच्या दोन पिढ्‌या तेथे खपल्या आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वयंसेवकांनी राष्ट्रकार्य करत आपले पुर्ण जीवन ईशान्य भारतातील राज्यात घालवले आहे. त्यामुळे भाजपाचे संघटन मजबूत झाले आणि त्याचीच परिणीती म्हणून आज भाजपाची आसाममध्ये सत्ता आली आहे. २०११ च्या निवडणुकीत आसाममधून भाजपाने १३९ जागा लढवल्या होत्या पण एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळी मात्र भाजपाने ८७ जागा जिंकत स्पष्ट बहूमत मिळवले आहे.
संसदेच्या कामात विशेषत: राज्यसभेत या निवडणुकांच्या निकालांचा भाजपाला फायदा होणार आहे. राज्यसभेत भाजपाचे बहुमत नसल्यामुळे विधेयकं मंजुर करण्यासाठी भाजपाला अडचण होत होती. पण आता आसाममधला विजय आणि ममता बॅनर्जी आणि जयललिता यांच्या विजयामुळे भाजपाला जीएसटी सारखी महत्त्वाची विधेयकं राज्यसभेत पारित करुन घेणे सुखकर होणार आहे. ११ जून रोजी होणार्‍या राज्यसभेच्या निवडणुकांत ममता, जयललितांना आणि भाजपालाही फायदा होणार आहे. बीजेडी आणि जयललिता भाजपाच्या बाजूने आहेतच शिवाय आता ममता बॅनर्जीही सकारात्मक भूमिका घेतील कमीत कमी तटस्थ राहून मदत करतील.
भाजपाचा हा विजय लक्षणीय असला तरी खरे तर तो केवळ आसाम पुरताच मर्यादीत आहे असे म्हणावे लागेल. कारण प्रत्यक्ष सत्तेची गणितं जमवताना मतांची वाढलेली टक्केवारी फायद्याची ठरु शकत नाही. सन २०११ च्या या पाच राज्यातील निवडणुकांत भाजपाने पाचशेहून अधिक उमेदवार उभे केले होते. त्यात केवळ ५ उमेदवारच निवडून आले. तेव्हा कोणी तरी ‘भाजपाने या निवडणुका लढणे म्हणजे कॅनडाने विश्‍वचषक खेळण्यासारखे आहे’ अशा उपहासाने ट्वीट केले होते. पण आज आसाम वगळता स्थिती बर्‍याच अंशी तशीच आहे. भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत चांगली वाढ झालेली असली तरीही सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने इतके बळ कुचकामी ठरत असते आणि आपल्याला पुढची पाच वर्षे वाट पहात बसावे लागते. पाच  वर्षे घालवणे जनतेलाही परडणारे नाही आणि पक्षालाही. पश्‍चिम बंगला, केरळ, तामिळनाडु, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यात भाजपाची स्थिती कमकुवत आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून स्थान मिळवण्यात भाजपाने चांगले यश मिळवले आहे. या राज्यात मतांचे टक्केवारी वाढली असली  तरी पक्षाची स्थिती बळकट होणे, संघटनात्मक बळ वाढवणे महत्त्वाचे आहे. या पाच राज्यातील येणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्ता काबीज करायची असेल तर पक्ष कार्याचा वेग केवळ दूप्पट करुन चालणार नाही तर हा कामाचा वेग दसपटीने वाढवावा लागेल, या राज्यातील जनतेच्या घराघरापर्यंत पोहचावे लागेल तेही सतत. तेव्हा कोठे पुढच्या निवडणुकीत पश्‍चिम बंगला, केरळ, तामिळनाडु, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यात भाजपा सत्ता मिळवू शकेल. भाजपाने नगण्य स्थान असलेल्या राज्यात किती काम करावे लागेल हे भाजपा श्रेष्ठींना आणि नेत्यांना सांगण्याची गरज नाही. पण राष्ट्रीय पक्ष म्हणून अभेद्य स्थान आणि स्थिती निर्माण करायची असेल तर हाच एकमेव शाश्‍वत राजमार्ग आहे आणि कामाचा वेग हाच त्याचा खरा बीजमंत्र आहे.
•चौफेर : अमर पुराणिक•
विरोधक आणि विशेषत: कॉंगे्रस उन्हाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रात बॅकफूटवर गेली आहे. संसदेत, न्यायालयात आणि जनतेसमोर त्यांची पळता भूई थोडी व्हायला सुरुवात झाली आहे. डॉ. सुब्रमण्यम स्वामी, मनोहर पर्रिकर यांच्या भेदक मार्‍याला कॉंग्रेस तोंड देऊ शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणं कॉंग्रेस आणि गांधी घराण्याला घेऊन बुडणार अशी गंभीर परिस्थिती आहे.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून संसदेचे कामकाज विरोधकांनी नीट चालू दिलेले नाही. सतत गोंधळ घालून कामकाज बंद पाडण्याचा प्रयोग मागील पानावरुन पुढे असाच सुरु आहे. लोकसभेत भाजपाचे संख्याबळ असल्याने थोडेतरी कामकाज पुढे रेटले गेले. पण राज्यसभेत मात्र आजपर्यंत अतिशय वाईट स्थिती होती. भाजपाकडे राज्यसभेत संख्याबळ नसल्याने राज्यसभेत जास्त गोंधळ घातला गेला अजूनही स्थिती तशीच आहे. भाजपा राज्यसभेत कमकुवत ठरत आहे. पण संसदेच्या उन्हाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्राला सुरुवात झाली आणि राज्यसभेतील चित्र बदलत गेले. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे राज्यसभेत आगमन होताच कॉंग्रेसच्या पाचावर धारण बसली आहे. डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे आपल्या बेधडक स्वभावसाठी आणि सत्याची साथ देणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना सोशल मिडियावर ‘वन मॅन आर्मी’ म्हंटले जाते. उत्तम कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि राजनीतिज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ. स्वामी यांनी आजपर्यंत कॉंग्रेसची पळता भूई थोडी केली आहे. राज्यसभेत येऊन अजून आठ दिवसही झाले नाहीत पण ते सदनात आल्यापासून कॉंगे्रसजन हैराण झाले आहेत.
तर दुसर्‍या बाजूला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणावर जोरदार भूमिका मांडत बिरबल आणि बादशहाची मजेदार पण सूचक गोष्ट सांगून विरोधकांची बोलती बंद केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्र्यांच्या भाषणाचे कौतूक केले. पंतप्रधानांनी पर्रिकर यांच्या भाषणाचेे कौतूक करताना, पर्रिकरांचे भाषण हे उत्तम संसदीय परंपरांचा दाखला देणारे भाषण असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी पर्रिकरांच्या भाषणाची व्हिडीओ लिंक टाकून राजकारणातून वर उठून संरक्षण मंत्र्यांनी तथ्यं समोर आणली असल्याचे नमुद केले आहे. ऑगस्टा वेस्टलँड व्हिव्हिआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन पर्रिकरांनी कॉंग्रेसची फोल खोलली तर डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनीही हेलिकॉप्टर घोटाळ्यावरुन कॉंग्रेसची पिसं काढली.
हेलिकॉप्टर घोटाळ्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बुधवारी कॉंग्रेस आणि भाजपा सदस्यांत जोरदार खडाजंगी झाली. सदनातील चर्चेदरम्यान विरोधकांच्या  प्रश्‍नांना उत्तर देताना पर्रिकर यांनी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात घोटाळा झाला होता आणि हा घोटाळा झाल्याचे इटलीच्या न्यायालयानेही मान्य केले आहे. शिवाय तेव्हाचे संपुआ सरकारचे संरक्षण मंत्री ए.के. एँटनी यांनीही घोटाळा झाल्याचे मान्य केले होते. आता देश जाणू ईच्छितो की या भ्रष्टाचारात कोण कोण सामिल आहेत, कोणा कोणाचे याला समर्थन मिळाले आणि कोणी कोणी लाच खाल्ली. सरकार या भ्रष्टाचाराचा तपास करेल की, कोणी कोणी लाच घेतली, आम्ही ही बाब अशीच सोडून देणार नसल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेस सदस्य अभिषेक मनु सिंघवी यांची फिरकी घेत पर्रिकर म्हणाले की, सिंघवी यांचे आज खूप नुकसान झाले, ते चांगले वकील आहेत, त्यांनी हेलिकॉप्टर प्रकरणावर खूप चांगला युक्तीवाद केला. पण जर केसच कमकुवत असेल तर चांगला वकीलही केस जिंकु शकत नाही. कॉंग्रेसवर पलटवार करताना पर्रिकरांनी अकबर-बिरबलाची गोष्ट सांगितली. एकदा बादशहा अकबराने बिरबलाला बोलावले आणि म्हणाला की सोन्याचा चमचा चोरीला गेला आहे. बिरबलाने सार्‍या सेवकांना बोलावले आणि सर्व सेवकांच्या हातात बांबू दिले आणि म्हणाला की हे जादूचे बांबू आहेत. ज्याने चोरी केली असेल त्याचा बांबू रात्रीत चार इंच लांब होईल. हे ऐकून ज्याने चोरी केली होती तो घाबरला. त्याने एक शक्कल लढवली आणि आपला बांबू चार इंच कापला. दुसर्‍या दिवशी चोर पकडला गेला. या गोष्टीप्रमाणे आपण सर्व कॉंग्रेस नेत्यांनी आपले बांबू चार इंच कापले आहेत. संरक्षण मंत्री पर्रिकरांच्या या खुमासदार गोष्टीमुळे कॉंग्रेस सदस्य संतापले आणि गोंधळ घालायला सुरुवात केली. अतिशय तिखट प्रतिक्रिया देत कॉंग्रेसनेते गुलाम नबी आझाद यांनी लिहून आणलेले भाषण संरक्षण मंत्री सदनात वाचू शकत नाहीत असे म्हणून लिखित भाषण वाचून त्यांनी सदनाचा अपमान केला असल्याचे म्हणताच कॉंग्रेस सदस्यांनी गोंधळ सुरु केला. त्यानंतर पर्रिकरांनी लिखित प्रत खाली ठेऊन प्रत न पाहता बोलू लागले तरीही गोंधळ चालूच ठेवला. त्या आधी कॉगे्रस नेते अहमद पटेल आणि आनंद शर्मा यांनी भ्रष्टाचार झाला नसल्याचे सांगत दस्तावेज खरे असल्याचे सिद्ध करा असे म्हणत गोंधळ घातला.
एका बाजूने संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी किल्ला लढवला तर दुसर्‍याबाजुने डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोधकांच्या भ्रष्टाचाराची लख्तरं वेशीवर टंागली. डॉ. सुब्रमण्यम स्वामी राज्यसभेत आल्यानंतर पहिल्याच दिवशी पहिले दोन शब्द बोलताच संपुर्ण सदनात गदारोळ माजला होता. डॉ. स्वामी यांनी सोनिया गांधींचे नाव घेतल्याबरोबर कॉंग्रेस सदस्यांनी गोंधळ घालून डॉ. स्वामी यांना बोलूच दिले नाही. कॉंग्रेस सदस्यांनी डॉ. सुब्रमण्यम स्वामींबाबत अभद्र टिप्पणी करत आक्रमक इशारे केले. दुसर्‍या दिवशी डॉ. स्वामी यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठाशी संबंधित मुद्दा उपस्थित करताच सर्व सेक्यूलर विरोधकांनी इतका गोंधळ घातला की कामकाज थांबवावे लागले.
राज्यसभेत स्वामी यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात ज्यांची नावे आहेत त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असे म्हणाले. ऑगस्टा डील मधील घोटाळाच्या चौकशीचा तेव्हाचे संरक्षण मंत्री ए.के. एँटनी यांचा सल्ला कोणाच्या सांगण्यावरुन मान्य केला नव्हता? हे आदेश मनमोहन सिंग यांनी दिले होते का? पहिल्यांदी ऑगस्टा डील ७९३ कोटी रुपयांत झाली होती नंतर हीच डील ४८०० कोटीत कशी फायनल केली गेली? असा सवाल करत डॉ. स्वामी यांनी या व्यवहारातील मध्यस्थ क्रिश्‍चियन मिशेलचे पत्र वाचायला सुरुवात केली. या पत्रात सोनिया गांधीचे नाव आहे आणि पत्रात सोनिया गांधी यांना ड्रायव्हिंग फोर्स अर्थात कर्ता-करवीता/सुत्रधार असे संबोधले गेले आहे. हे पत्रा वाचताच पुन्हा सदना गोंधळ सुरु झाला. उपसभापतींनी या पत्राचे प्रमाण सिद्ध करा असे सांगितले त्यानंतर विरोधकांनी आणखी गोंधळ घातला तेव्हा स्वामी यांनी आपल्या सदस्यांना थांबवा असा सल्ला दिला व मनमोहन सिंग यांच्या आधी सोनिया गांधी यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.
या शिवाय डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी गेल्या काही महिन्यांपासून डेक्कन हेराल्ड प्रकरण, चिदंबरम पिता पुत्रांचे नोटा छापण्याच्या मशिन खरेदीचे प्रकरण आदींचा जोरदार पाठपुरावा सुुरु ठेवला आहे. एकंदर विरोधक आणि विशेषत: कॉंग्रेस उन्हाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रात बॅकफूटवर गेली आहे. संसदेत, न्यायालयात आणि जनतेसमोर कॉंग्रेसची पळता भूई थोडी व्हायला सुरुवात झाली आहे. डॉ. सुब्रमण्यम स्वामी, मनोहर पर्रिकर यांच्या भेदक मार्‍याला कॉंग्रेस तोंड देऊ शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणं कॉंग्रेस आणि गांधी घराण्याला घेऊन बुडणार अशी परिस्थिती आहे. भाजपा खासदार मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हंटल्याप्रमाणे सध्या ‘घुस देनेवाले जेल मे, और घुस लेनेवाले वेल मे’ अशी स्थिती असली तरी लवकरच घुस लेनेवाले देखील जेलमध्ये जाणार हे निश्‍चित! 
•चौफेर : अमर पुराणिक•
मागे हिवाळी अधिवेशनात नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिल्यावरून गोंधळ घालून संसदेचे कामकाज चालू दिले नाही. आता ऑगस्टा वेस्टलँड व्हिव्हिआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन गोंधळ घालून उन्हाळी अधिवेशनाचे दुसरे सत्र वाया घालवणार हे निश्‍चित. या जोडीला इरशत जहां प्रकरण, एअरसेल मॅक्सीस सौदा प्रकरण आदी प्रकरणेही आहेतच. एकंदर सध्या कॉंग्रेसची स्थिती अशी आहे की, प्रचंड भ्रष्टाचार करुन वर पुन्हा साजुक असल्याचा आव आणून देशाचे पुन्हा नुकसान करणार. ‘पडले तरी नाक वर’ या म्हणीप्रमाणे कॉंग्रेसची सध्याची राजकीय भूमिका आहे.  पण यावेळी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरचा पंखा सोनिया गांधींचा व कॉंग्रेसचा गळा कापणार हे निश्‍चित.
ज्येष्ठ भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची नुकतीच राज्यसभेवर निवड झाली. त्याच दरम्यान इटलीतील न्यायालयाच्या निर्णयामुळे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याला नवे वळण लागले. हा केवळ योगायोगच म्हणायचा. २०१० साली कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकारने १२ ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा सौदा केला होता. हा सौदा ३,६०० कोटी रुपयांचा होता. या वादग्रस्त सौद्यात १० टक्के रक्कम लाच म्हणून दिली गेल्याचे समोर आले होते. त्यावेळी एअर चिफ मार्शल एस पी त्यागी यांच्यासह १३ लोकांवर गुन्हे दाखल झाले होते.
आतापयर्र्त कॉंग्रेस नेत्यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आली आहेत. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा, आदर्श घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा, सिंचन घोटाळा, टाट्रा ट्रक घोटाळा, नॅशनल हॅराल्ड घोटाळा अशी भली मोठी घोटाळ्यांची यादीच आहे. जोपर्यंत घोटाळे उघड होत नाहीत, तोपर्यंत कॉंग्रेस नेते स्वत प्रामाणिक असल्याचे दाखवत मिरवत असतात. पण जेव्हा घोटाळे उघडकीस येतात तेव्हा संबंधित मंत्री भ्रष्ट असल्याचे दाखवले जाते. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी मात्र कायमच स्वत:ला धुतल्या तांदळाचे असल्याचे ठरवून मोकळे झाले आहेत. खरे तर कॉंग्रेसच्या संपुआ सरकार काळात जितकेही भ्रष्टाचार झाले त्यापैकी बहुसंख्य घोटाळ्यांचे मुख्य सुत्रधार सोनिया, राहुल आहेत. पण ‘सापडला तो चोर’ या उक्तीप्रमाणे जर घोटाळे उघडकीस आले तर संबंधित कॉंग्रेस नेते गुन्हेगार ठरले पण कॉंग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी आणि सेक्यूलर माध्यमांनी मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना त्याची झळ लागु दिली नाही. याचा अर्थ मलई खायला सोनिया आणि राहुल आहेत आणि सापडल्यानंतर मात्र बळीचे बकरे सुरेश कलमाडी पासून पी. चिदंबरम, मनमोहन सिंग पर्यंत अनेक नेते आहेत.
डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आजपर्यंत अनेक प्रकरणात सोनिया, राहुल आणि गांधी कुटुंबियांनची भ्रष्ट लख्तरं बाहेर काढली आहेत. दोन महिन्यांपुर्वीच नॅशनल हॅराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. तर सोनिया, राहुल आणि कॉंग्रेस नेत्यांनी प्रचंड थयथयाट करुन गोंधळ घातला, संसद ठप्प केली. न्यायालयीन निर्णयाला राजकीय सुड म्हणत भाजपाला धारेवर धरत संसदच वेठीस धरली होती. आता ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यावरुन कॉंग्रेस नेत्यांचा गोंधळ सुरु झाला आहे.
इटलीतील न्यायालयाने ऑगस्ट वेस्टलँडचा प्रमुख गुइसेपे ओरसी याने भारतातील नेत्यांना आणि अधिकार्‍यांना लाच दिल्याने दोषी अढळला आणि त्याला न्यायालयाने साडे चार वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. इटलीतील या न्यायालयाच्या दस्तावेजात ‘सिनगोरा’ गांधी अर्थात सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पाच नेत्यांचा उल्लेख केला आहे. इटलीच्या भाषेत सिनगोरा हा शब्द ‘श्रीमती’ अशा अर्थाने वापरला जातो. न्यायालयाने हे मान्य केले आहे की, या घोटाळ्यात दलाली केलेल्या भारतीय नेते  व अधिकार्‍यांना १२० ते १२५ कोटी रुपयांची लाच दिली गेली आहे.
भारतीय वायुसेनेसाठी भारताने १२ हेलिकॉप्टर खरेदीचा व्यवहार ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर बनविणार्‍या कंपनीशी केला. या कंपनीचे नाव फिनमेक्कानिक असे आहे. या व्यवहारात घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर १२ एडबल्यू-१०१ व्हिव्हिआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीचा करार भारत सरकारकडून फेब्रुवारी २०१३ मध्ये थांबवला गेला. जेव्हा करार थांबवण्याचा आदेश जारी केला होता तेव्हा भारत सरकारने ३० टक्के रक्कम खरेदी पोटी दिली होती आणि आणखीन ३ हेलिकॉप्टरसाठी रक्कम भरण्याची प्रक्रिया सुरु होती. तिकडे इटलीत न्यायालयात ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर विक्रीत भ्रष्टाचार करुन चूकीचे अकांऊटीग सादर केल्याबद्दल फिनमेक्कनिकाचे माजी प्रमुख गुईसेपे ओर्सी आणि ऑगस्ट वेस्टलँडचे माजी सीईआ बुर्नो स्पागनोलीनी यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले. त्याचाच निकाल देत इटलीच्या मिलान न्यायालयाने साडे चार वर्षांची कैदेची शिक्षा ठोठावली. या दोघांवर आंतरराष्ट्रीय भ्र्रष्टाचार आणि भारताच्या नेत्यांना आणि अधिकार्‍यांना जवळजवळ ४,२५० कोटी रुपयांची लाच देऊन बनावट बिलं बनवण्याचा आरोप होता.
या व्हिव्हीआयपी हेलिकॉप्टर ऑगस्टा वेस्टलँडच्या खरेदीची निविदा मंजूर करण्यासाठी, ५३ कोटी डॉलरचा ठेका मिळवण्यासाठी साधारणपणे १२५ कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपात ऑगस्ट वेस्टलँडच्या दोन अधिकार्‍यांना शिक्षा झाली आहे. अनेक आंतरराष्टीय वृत्तपत्रात निकालाची माहितीही प्रसिद्ध झाली आहे. इटलीतील मिलान येथील न्यायालयाच्या दस्तवेजात म्हंटले आहे की लाच दिल्याचे ठोस पुरावे आहेत. भारताच्या माजी वायुसेनाप्रमुख एस पी त्यागी यांना पैसे मिळाल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. न्यायालयाने सांगितले आहे की कशा पद्धतीने कंपनीने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या निकटवर्ती सहकार्‍यांशी लॉबिईग केले. या शिवाय कंपनीने एम के नारायण, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशीही लॉबिईंग केले. न्यायाधिशांनी या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यापाठीमागे मुख्य व्यक्ती सोनिया गांधी असल्याचे म्हंटले आहे. इटली कोर्टाच्या दस्तावेजात सिगनोरा(श्रीमती) सोनिया गांधी यांचे नाव ४ वेळा आले आहे तर २ वेळा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे शिवाय ऑस्कर फर्नांडिस व एम के नारायणन यांचेही नाव आहे.
आता इतकं सगळं झाल्यानंतर भारतात गदारोळ होणे सहाजिकच आहे. भाजपाने संसदेत या मुद्द्यावर कॉंग्रेसला घेरणेही स्वाभाविक आहे. भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी राज्यसभेत नुसते सोनिया गांधी यांचे नाव इटलीतील कोर्टाच्या दस्तावेजात असल्याचे सांगितले तर लगेच कॉंग्रेस खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घालायला सुुरुवात केली. त्यामुळे राज्यसभा १२ वाजेपर्यंत तहकुब केली गेली. नंतर भाजपा खासदार मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की कॉंग्रेस अराजकता पसरवते आहे, ‘घुस देनेवाले जेल मे है और घुस लेनेवाले वेल मे है’ असा टोला लगावला. येत्या आठवड्‌यात संसदेचे कामकाज या मुद्द्यावरून ठप्प होणार हे स्पष्टच आहे. यालाच म्हणतात ‘चोराच्या उलट्‌या बोंबा’. या प्रकरणात कदाचित कॉंग्रेसकडून सर्व आरोप माजी वायुसेनाप्रमुख त्यागी यांच्या माथी मारुन सोनिया गांधी स्वच्छ असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागे हिवाळी अधिवेशनात नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिल्यावरून गोंधळ घालून संसदेचे कामकाज चालू दिले नाही. आता ऑगस्टा वेस्टलँड व्हिव्हिआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन गोंधळ घालून उन्हाळी अधिवेशनाचे दुसरे सत्र वाया घालवणार हे निश्‍चित. या जोडीला इरशत जहां प्रकरण, एअरसेल मॅक्सीस सौदा प्रकरण आदी प्रकरणेही आहेतच. एकंदर सध्या कॉंग्रेसची स्थिती अशी आहे की, प्रचंड भ्रष्टाचार करुन वर पुन्हा साजुक असल्याचा आव आणून देशाचे पुन्हा नुकसान करणार. ‘पडले तरी नाक वर’ या म्हणीप्रमाणे कॉंग्रेसची सध्याची राजकीय भूमिका आहे. पण यावेळी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरचा पंखा सोनिया गांधींचा व कॉंग्रेसचा गळा कापणार हे निश्‍चित.